दुबई : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्काबाबत गावसकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता शमला आहे. गावसकर यांनी स्वत: अनुष्का प्रकरणात स्पष्टीकरण देत प्रकरण मिटवले, पण आता विराटच्या फॉर्मबाबत माजी महान क्रिकेटपटूने केलेले वक्तव्य चर्चेत आहे. कोहली यंदाच्या आयपीएल स्पर्धेत फॉर्मात नसल्याचे चित्र आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत केवळ १८ धावा केल्या. कोहलीच्या या निराशाजनक कामगिरीनंतरही गावसकर यांना वाटते की भारतीय कर्णधार मोसमाच्या अखेरपर्यंत ४००-५०० धावा फटकावेल.
आरसीबी व मुंबई यांच्यादरम्यानच्या लढतीनंतर गावसकर म्हणाले, ‘विराटकडे क्लास असल्याची प्रत्येकाला कल्पना आहे. गावसकर म्हणाले, ‘यंदाच्या मोसमात तो ९०० धावा फटकावणार नाही, कारण पहिल्या तीन सामन्यात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण तो ५०० धावा तर फटकावेलच.’दरम्यान, मुंबईविरुद्धच्या लढतीत विराट फॉर्मात नसल्याचे दिसून आले. त्याने ११ चेंडूंमध्ये केवळ तीन धावा केले. तो लेग स्पिनर राहुल चाहरचा पुन्हा एकदा बळी ठरला. २०१८ पासून फिरकी गोलंदाजी कोहलीची कमकुवत बाजू ठरली आहे. प्रत्येकजण त्याचा लाभ घेत आहे. तो कशाप्रकारे कमबॅक करतो, याबाबत उत्सुकता आहे.तीन सामन्यांत त्याची बॅट शांत असली तरी तो असा फलंदाज आहे की शेवटी तो सर्वकाही विसरायला भाग पाडेल. ज्यावेळी स्पर्धेचा शेवट होईल तोपर्यंत त्याने ४००-५०० धावा केलेल्या असतील. तो प्रत्येक वर्षी किमान एवढ्या धावा करतो. एका वर्षी तर त्याने जवळजवळ एक हजार धावा केल्या होत्या.’