कोलंबो, दि. 3 - भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या पाच विकेट आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारताने मालिकेतील शेवटच्या सामन्यात लंकेचा सहा विकेटनं पराभव करत लंकादहन केलं आहे. या विजयासह भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघाने सामन्यात लंकेला कुठेही वरचढ होऊ दिले नाही. भारताचा श्रीलंकेविरोधात हा दुसरा व्हाईटवॉश असेल. यापूर्वी भारताने 2014 च्या मालिकेतदेखील श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता. विराट कोहलीने आज 30 शतके ठोकली आहेत. त्यातील आठ शतके ही श्रीलंकेविरोधात आहेत. लंकेतील उकाडा आणि उष्णता यांवर मात करून भारताने पाठोपाठ मिळविलेले विजय संस्मरणीय आहेत.
श्रीलंकेनं दिलेले 239 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीलाच भारताला दोन धक्के बसले. शिखर धवनच्या जागी संघात जागा मिळालेल्या अजिंक्य रहाणेला अखेरच्या सामन्यात आपली छाप पाडता आलेली नाही. लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे अवघ्या 5 धावा काढून माघारी परतला आहे. लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर एकदा अजिंक्य रहाणेला जीवदान मिळालं मात्र त्यानंतर मलिंगानेच आपल्या गोलंदाजीवर रहाणेला माघारी पाठवलं. पाठोपाठ विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर रोहीत शर्माही बाद झाल्याने भारताला दुहेरी धक्का बसला.
दोन्ही सलामीवीर झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 99 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने श्रीलंकेला पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकललं. विराट कोहलीने यादरम्यान अर्धशतकी खेळी करत लंकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दुसऱ्या बाजूने मनीष पांडेनेही कोहलीला चांगली साथ दिली. मात्र मनीष पांडेला बाद करत पुष्पकुमाराने भारताला तिसरा धक्का दिला. पांडे बाद झाल्यानंतर मौदानात आलेल्या केदार जाधवनं धडाकेबाज फलंदाजी करत विराट कोहलीला साथ दिली. यादरम्यान त्यानं आपल अर्धशतक पूर्ण केलं. केदार जाधवनं 63 धावांची खेळी केली. सामना जिंकला असे वाटत असताना तो बाद झाला. कर्णधार विराट कोहलीनं नाबाद 110 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा, विश्वा फर्नांडो आणि मलिंदा पुष्पकुमारा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
त्यापूर्वी, पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची सुरुवात नेहमीप्रमाणे खराब झाली. मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यात श्रीलंकेनं भारतासमोर 239 धावांचे आव्हान ठेवलं. खराब सुरुवातीनंतर चौथ्या गड्यासाठी लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज यांनी केलेली 122 धावांच्या शतकी भागीदारीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात लंकेला अपयश आले. अखेरच्या षटकांध्ये धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात फलंदाजांनी नांग्या टाकल्या. भारताकाडून भुवनेश्वर कुमारने धारधार गोलंदाजी करताना लंकेच्या पाच फलंदाजांना माघारी झाडले. भुवनेश्वरनं लवंकेच्या दोन गड्यांना झडपट बाद करत दडपण निर्माण केलं होतं. त्यातच भर म्हणून बुमराहने कर्णधार थरंगाला बाद करत लंकेचे कंबरडेच मोडले होतं. पहिले 3 फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर चौथ्या गड्यासाठी लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज यांनी 122 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंखेच्या दिशेनं वाटचाल केली. मात्र भुवनेश्वर कुमारने लहिरु थिरीमनेचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. यानंतर काही वेळातच कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज महेंद्रसिंह धोनीकडे झेल देत माघारी परतला. यामुळे सुरुवातीच्या धक्क्यानंतर सावरलेल्या श्रीलंकेच्या संघाचे 5 गडी माघारी परतले.
लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूजने लंकेचा डाव सावरत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. लहिरु थिरीमन आणि मॅथुज यांनी आर्धशतके साजरी केली. सलामीचे 3 फलंदाज माघारी परतलेले असताना या दोन्ही फलंदाजांनी संघाचा धावफलक हालता ठेवला.
श्रीलंकेने दोनशे धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर आणखी एक खेळाडू धावबाद झाला. यानंतर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर अकिला धनंजया यष्टीचीत होऊन माघारी परतला. यादरम्यान महेंद्रसिंह धोनीने वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधीक यष्टीचीत करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. धोनीने आतापर्यंत 100 यष्टीचीत केले आहेत. यानंतर एकामागोमाक एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिल्याने अवघ्या काही मिनीटांमध्ये लंकेचे 9 गडी माघारी परतले. श्रीलंकेच्या तळातल्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत लंकेला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. मात्र भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाला बाद करत श्रीलंकेचा डाव 238 धावांवर संपवला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या. त्याला जसप्रीत बुमराहने २ तर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.
धावफलक : श्रीलंका : निरोशन डिकवेला झे. व गो. भुवनेश्वर २, उपुल थरंगा झे. धोनी गो. बुमराह ४८, दिलशान मुनावीरा झे. कोहली गो. भुवनेश्वर ४, लाहिरू थिरीमन्ने त्रि. गो. भुवनेश्वर ६७, अँजेलो मॅथ्यूज झे. धोनी गो. कुलदीप ५५, मिलिंदा सिरिवर्धना झे. शार्दुल गो. भुवनेश्वर १८, वनिंदू हसरंगा धावबाद (धोनी - चहल) ९, अकिला धनंजया यष्टिचित धोनी गो. चहल ४, मलिंदा पुष्पकुमारा त्रि. गो. बुमराह ८, विश्वा फर्नांडो नाबाद ७, लसिथ मलिंगा झे. राहुल गो. भुवनेश्वर २. अवांतर - १४. एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद २३८ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९.४-०-४२-५; शार्दुल ठाकूर ६-०-४८-०; जसप्रीत बुमराह १०-०-४५-२; कुलदीप यादव १०-०-४०-१; केदार जाधव ४-०-२०-०; यजुवेंद्र चहल १०-०-३६-१. भारत : रोहित शर्मा झे. मलिंगा गो. फर्नांडो १६, अजिंक्य रहाणे झे. मुनावीरा गो. मलिंगा ५, विराट कोहली नाबाद ११०, मनीष पांड्ये झे. थरंगा गो. पुष्पकुमारा ३६, केदार जाधव झे. डिकवेला गो. वनिंदू ६३, महेंद्रसिंह धोनी नाबाद १. अवांतर - ८ धावा. एकूण : ४६.३ षटकांत ४ बाद २३९ धावा. गोलंदाजी : लसिथ मलिंगा ८-१-३५-१; विश्वा फर्नांडो ७-०-४०-१; अकिला धनंजया १०-०-४९-०; अँजेलो मॅथ्यूज ३-०-१४-०; मलिंदा पुष्पकुमारा १०-०-४०-१; मिलिंदा सिरिवर्धना ४-०-२८-०; वनिंदू हसरंगा ४.३-०-२९-१.
Web Title: Viratasek ladkadhan, last clear with the clean sweep
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.