2017 सालात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघानं आपलं वर्चस्व कायम राखलं. कसोटी, वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत भारताने सरत्या वर्षाचा शेवटही गोड केला. गतवर्षी भारतानं 14 मालिकांसह 37 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र 2018 सालात भारतासमोर खडतरं आव्हान असणार आहेत. आगामी वर्षात भारताला बहुतांश सामने हे परदेशात खेळायचे आहेत. यापैकी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारतामध्ये जशा खेळपट्टय़ा असतात तशा निश्चितच दक्षिण आफ्रिकेत मिळणार नाहीत, तेथील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी जास्त मिळते. या दौऱ्यात गोलंदाजीबरोबरच भारतीय फलंदाजांची खरी परीक्षा असणार आहे.
2017 चा हंगाम भारतीय संघासाठी चांगला गेला असला तरीही भारताच्या यशात विशेष काहीच वाटत नाही. वर्षभरात भारत बहुतांश सामने हे घरच्या मैदानावर खेळला आणि काही अपवाद वगळले तर एकदाही भारताला प्रतिस्पर्धी संघाकडून कडवी टक्कर मिळालेली नाही. त्यामुळे एकतर्फी विजयच पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिका दौ-याची भारताची ही सातवी प्रदक्षिणा असेल. 1992 पासून भारतीय संघाला या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत.
आफ्रिकेत चांगली कामगिरी करेल, असा आत्मविश्वास विराट सेनेला आणि क्रीडाप्रेमींना असला तरी ते तितकं सोपं नाही. चेंडूला उसळी मिळाणाऱ्या मैदानावर आपले फलंदाज नांग्या टाकतात, हा इतिहास आहे. पण इतिहास हा बदलण्यासाठीच असतो. यंदा, हेच घडावे अशी अपेक्षा आहे.‘स्टेन’गनच्या पुनरागमनामुळं दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगलाच मजबूत झाला आहे. त्याचा वेगवान मारा, त्याला साथ देणारे भेदक गोलंदाज भारताची भंबेरी उडवू शकतात. धोनीच्या संघानं 2011मध्ये बरोबरी साधलेली असताना त्या पुढे जाऊन विराटसेनेला ऐतिहासिक मालिकाविजयासाठी मैदानावर राज्य गाजवावं लागणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात कोणत्याही क्षणी भारताला गाफिल राहणं परवडणारं नाही.
सध्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला जिंकण्याची भूक असल्याचे दिसून येते. संघासाठी ही चांगली गोष्ट आहे. विराट हा सध्याच्या घडीतला सर्वोत्तम फलंदाज आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. तर अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयकडून आपेक्षा असतील. गोलंदाज उमेश यादव, इशांत शर्मा ही दोघं आफ्रिकेच्या बाऊंसिंग पिचवर कमाल दाखवू शकतात. जडेजाच्या फिरकिच्या जाळ्यातही आफ्रिकन फलंदाज अडकू शकतात. पण सारा मामला...जर...तरचा आहे. सुरुवात चांगली झाली तर भारताला विजयाचा विश्वास निर्माण होईल. दोन्ही बलाढ्य संघ काय चमत्कार दाखवतात हे पाच तारखेपासून समजेलच. तोपर्यंत भारताकडूव मालिका विजयाच्या आशा बाळगण्यास हरकत नाही. अन्यथा भारतीय चाहते आपल्या हिरोंचं जसं कौतुक करतात तसंच पोस्टर्स जाळण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. हे आपल्याला अनुभवातून माहितच आहे. ही वेळ येऊ नये ही अपेक्षा.
भारताच्या दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यावर थोडक्यात नजर -
वर्ष 1992-1993(चार कसोटी सामन्यांची मालिका)भारताचा 1-0 नं पराभव वर्ष 1996-1997 ( तीन कसोटी सामन्याची मालिका )भारताचा 2-0नं पराभव
वर्ष 2001-02 (2 कसोटी सामन्यांची मालिका)दक्षिण आफ्रिका 1-0 च्या फरकाने विजयी
वर्ष 2006-07 (तीन कसोटी सामन्यांची मालिका)दक्षिण आफ्रिका 2-1 च्या फरकाने विजयी
वर्ष 2010-11 ( 3 कसोटी सामन्यांची मालिका)मालिका 1-1 ने बरोबरीत
वर्ष 2013 -14 ( 2 कसोटी सामन्यांची मालिका)दक्षिण आफ्रिका 1-0 च्या फरकाने विजयी
दक्षिण आफ्रिकेतील भारताची ही कामगिरी पुरेशी बोलकी आहे. याचसोबत ही आकडेवारी हे देखील सांगते की भारतीय संघासाठी पुढचा काळ हा सोपा नसणार आहे. जलद खेळपट्ट्या, उसळणारे चेंडू आणि तेजतर्रार गोलंदाजांचा तोफखाना यापुढे भारताचे फलंदाज कसा तग धरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ हा तुल्यबळ आहे. या संघात अव्वल फिरकीपटू, जलदगती गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू यांचा भरणा आहे. त्यामुळे या मालिकेत भारताला विजयाची समसमान संधी आहे. याचसोबत दक्षिण आफ्रिकेत जाण्याची ही आपली पहिली वेळ नाहीये, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, पुजारा, रोहित शर्मा यासारख्या फलंदाजांना आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे थोडी मेहनत घेतल्यास या मालिकेत भारताला नक्कीच सकारात्मक निकाल मिळू शकतात.