कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रेटी समोर आली. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी सलामीवीर गौतम गंभीर, अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना, इरफान व युसूफ पठाण, भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आदी सर्वांनी पुढाकार घेत आपापल्या परीनं निधी जमा केला. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कधी मदत करणार, असा सवाल नेटिझन्स करत होते. पण, अखेरीस सोमवारी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मदत करण्याचा निर्णय सोशल मीडियावरून कळवला.
अनुष्कानं ट्विट केलं की,''विराट आणि मी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मदत निधीत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांना होत असलेला त्रास बघून आम्हाला वेदना होत आहेत. आम्ही आमच्या परीनं मदत केली आहे.''