नागपूर : विराट कोहलीची (२१३ धावा, २६७ चेंडू, १७ चौकार, २ षटकार) विक्रमी द्विशतकी खेळी व पुनरागमन करणाºया रोहितने (नाबाद १०२ धावा, १६० चेंडू, ८ चौकार, १ षटकार) नाबाद शतकी खेळी करीत शतकवीर मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी रचून दिलेल्या मोठ्या धावसंख्येच्या पायावर कळस चढविला आणि भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेत विजयाची मजबूत पायाभरणी केली.व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुसºया कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळणाºया भारताने ६ बाद ६१० धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावात ४०५ धावांची भक्कम आघाडी घेतली. प्रत्युत्तरात खेळताना दिवसअखेर श्रीलंकेची दुसºया डावात १ बाद २१ धावा अशी अवस्था झाली आहे. रविवारी तिसºया दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी ११ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या दिमुथ करुणारत्ने याला लाहिरू थिरिमाने (९) साथ देत होता. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असलेल्या या कसोटीत भारतीय संघाची डावाने विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सोमवारी चौथ्या दिवशी श्रीलंकेचा डाव किती सत्रात संपणार, याची उत्सुकता कायम राखत आज तिसºया दिवसाचा खेळ संपला. श्रीलंकेला डावाने पराभव टाळण्यासाठी अद्याप ३८४ धावांची गरज आहे. रोहित शर्माने चार वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली.आजचा दिवस विराटने गाजवला. पहिल्या सत्रात शतक पूर्ण करणाºया विराटने अखेरच्या सत्रात कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकावले. परेराच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत त्याने हा पराक्रम केला. कोहलीने लकमलच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटला एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. द्विशतक पूर्ण केल्यानंतर परेराच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात कोहलीचा उडालेला झेल करुणारत्नेने टिपला. कोहलीने रोहितसोबतपाचव्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली.श्रीलंकेची दुसºया डावात सुरुवात निराशाजनक झाली. ईशांत शर्माने पहिल्याच षटकातील दुसºयाच चेंडूवर समरविक्रमाची दांडी उडवत भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्याआधी, कालच्या २ बाद ३१२ धावसंख्येवरून भारताने पुढे खेळण्यास सुरुवात केली. पुजारा व कोहली यांनी तिसºया विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी केली. शनाकाने पुजाराचा (१४३) त्रिफळा उडवत ही भागीदारी संपुष्टात आणली. श्रीलंकेला रविवारी पहिल्या सत्रात हे एकमेव यश मिळवता आहे. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या अजिंक्य रहाणेला (२) मोठी खेळी करता आली नाही. उपाहारानंतर सुरुवातीलाच परेराने रहाणेला माघारी परतवले. रविचंद्रन अश्विन (५) झटपट माघारी परतला. त्यालाही परेराने बाद केले. रोहितने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी रोहितच्या साथीला दुसºया टोकावर रिद्धिमान साहा (नाबाद ०१) होता. श्रीलंकेतर्फे दिलरुवान परेराने ३ तर हेराथ, गमागे व शनाका यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.चौथ्यांदा भारताच्या चार फलंदाजांनी एकाच डावात शतक ठोकले.कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावताना कोहलीने सुनील गावसकर यांना मागे टाकले.चेतेश्वर पुजाराने सर्वांत कमी डावात तीन हजार कसोटी धावांचा टप्पा पार करताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने ५५ डावांमध्ये, तर पुजाराने ५३ डावांमध्ये ही कामगिरी केली.तब्बल ४ वर्षांनंतर रोहित शर्माने झळकावले शतक. याआधी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी सामन्यात रोहितने शतकी खेळी केली होती.रोहितने तिसरे कसोटी शतक झळकावले.गेल्या ७ डावांमध्ये पाचव्यांदा मुरली विजय-चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी केली.
धावफलकश्रीलंका पहिला डाव २०५.भारत पहिला डाव :- के. एल. राहुल त्रि. गो. गमागे ०७, मुरली विजय झे. परेरा गो. हेराथ १२८, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. शनाका १४३, विराट कोहली झे. करुणारत्ने गो. परेरा २१३, अजिंक्य रहाणे झे. करुणारत्ने गो. परेरा ०२, रोहित शर्मा नाबाद १०२, रविचंद्रन आश्विन त्रि. गो. परेरा ०५, रिद्धिमान साहा नाबाद ०१. अवांतर (९). एकूण १७६.१ षटकांत ६ बाद ६१० (डाव घोषित). बाद क्रम : १-७, २-२१६, ३-३९९, ४-४१०,५-५८३, ६-५९७. गोलंदाजी : सुरंगा लकमल २९-२-१११-०, लाहिरू गमागे ३५-८-९७-१, रंगना हेराथ ३९-११-८१-१, दासुन शनाका २६.१-४-१०३-१, दिलरुवान परेरा ४५-२-२०२-३, दिमुथ करुणारत्ने २-०-८-०.श्रीलंका दुसरा डाव :- सदिरा समरविक्रमा त्रि. गो. ईशांत ००, दिमुथ करुणारत्ने खेळत आहे ११, लाहिरू थिरिमाने खेळत आहे ०९. अवांतर (१). एकूण ९ षटकांत १ बाद २१. बाद क्रम : १-०. गोलंदाजी : ईशांत शर्मा ४-१-१५-१, रविचंद्रन आश्विन ४-३-५-०, रवींद्र जडेजा १-१-०-०.