विराट कोहली, भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि तितकाच आक्रमक कर्णधार, भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यापासून विराटने संघाला अनेक दैदिप्यमान विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या कुशल कप्तानीच्या जोरावर भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहोचलाय. मात्र इंग्लडविरुद्ध बुधवारपासून सुरू होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाच्या क्षमतेची आणि विराट कोहलीच्या नेतृत्व गुणांची कसोटी लागणार आहे.
भारताच्या कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून विराट कोहलीने धडाकेबाज कामगिरी करत आपल्या नेतृत्वगुणांची छाप पाडून दाखवली आहे. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे नेतृत्व अधिकच बहरलेले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका अशा दिग्गज संघाना कसोटी मालिकांमध्ये पराभूत करण्याची किमया भारतीय संघाने साधलीय. मात्र यातील बहुतांश मालिका विजय हे भारतीय संघाने घरच्या मैदानावर खेळतानाचा मिळवलेले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा अपवाद वगळता भारतीय संघाने परदेशी खेळपट्टीवर फारसे कसोटी सामने खेळलेले नाहीत. त्यातही दक्षिण आफ्रिकेमध्ये विराट सेनेला कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. त्यामुळे आता विराटवर आपले नेतृत्वगुण सिद्ध करून दाखवण्यासाठी इंग्लंडमधील कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करून दाखवण्याचा दबाव असेल.
गेल्या दोन इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यातच 2014 साली भारतीय संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीची कामगिरी अगदीच सुमार झाली होती. त्यावेळी पाच कसोटी सामन्यांच्या संपूर्ण मालिकेत मिळून त्याला अवघ्या 135 धावाच जमवता आल्या होत्या. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत एक फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्याचे आव्हानही त्याच्यासमोर असेल. मात्र गेल्या चार वर्षांत विराट कोहली एक फलंदाज म्हणून परिपक्व झालाय. विविध परिस्थितीत खेळताना त्याने स्वत:ला सिद्ध केलेय. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना त्यांच्याविरोधात विराटने धडाकेबाज खेळ केला होता. ती बाबही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे या दौऱ्यात विराटकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.
मात्र एक कर्णधार म्हणून विराटसमोरील आव्हान नक्कीच खडतर आहे. प्रतिस्पर्धी इंग्लंडचा संघ तुल्यबळ आहे. अॅलेस्टर कूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर असे फलंदाज आणि जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉडसारख्या अनुभवी गोलंदाज प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या दिमतीला आहेत. सोबत इंग्लंडमधील वातावरणही भारतीय संघाची परीक्षा पाहणारे आहे. त्यातच गेल्या दोन दौऱ्यात कसोटी मालिकेमध्ये झालेल्या पराभवांचे ओझेही विराटसेनेवर असेलच. या सर्वांवर मात करून आपल्या संघाला दिशा देण्याचे आव्हान विराटसमोर आहे. त्याच्या दिमतीला असलेला भारतीय संघही भक्कम आहे. संघामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांची घडी योग्य बसलेली आहे. आता गरज आहे ती केवळ आखलेल्या रणनीतीची मैदानात योग्य अंमलबजावणी करण्याची.
आधी अजित वाडेकर, कपिल देव, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांनी इंग्लंडमधील कसोटी मालिकांमध्ये आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. त्यापैकी अजित वाडेकर, कपिल देव, आणि राहुल द्रविड यांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची किमयाही साधलीय. तर सौरव गांगुलीने 2002 च्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या नेतृत्वाची छाप पाडली होती. आता ही संधी विराटकडे चालून आलेली आहे. पण त्यासाठी विराटला आपल्या स्वभावातील आक्रमकता खेळामध्येही दाखवावी लागेल.
Web Title: Virat's leadership test in England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.