जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेली तिसरी कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. पहिला डाव १८७ धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघानेही दक्षिण आफ्रिकेवर जोरदार पलटवार केला आहे. जसप्रीत बुमरान आणि भुवनेश्वर कुमार यांनी भेदक मारा करून दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या १९४ धावांत गुंडाळले. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 49 धावांपर्यंत मजल मारली असून, भारताकडे 42 धावांची आघाडी जमा झाली आहे.
7 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने सलामीच्या जोडीत बदल करून पार्थिव पटेलला सलामीला धाडले. मात्र पार्थिव फार कमाल करू शकला नाही. तो 16 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मात्र मुरली विजय (खेळत आहे 13) आणि लोकेश राहुल (खेळत आहे 16) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अधिक यश मिळू न देता भारताला दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 49 धावांपर्यंत पोहोचवले.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचीही घसरगुंडी उडाली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या वेगवान चौकडीने भेदक मारा करून यजमान फलंदाजांना अडचणीत आणले. दरम्यान, डीन एल्गर 4 धावा काढून भुवनेश्वरची शिकार झाला. नाइट वॉचमन कागिसो रबाडाने मात्र भारताच्या गोलंदाजांना हैराण केले. अमलाने रबाडासोबत अर्धशतकी भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेला सावरले. मात्र रबाडाची (30) विकेट पडल्यानंतर एबी डीव्हिलियर्स (5) फाफ डू प्लेसिस (8) आणि क्विंटन डी काॅक (8) हे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले.
अमलाने मात्र एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने फिलँडरसोबत महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. अखेर अमला (61) आणि फिलँडर (35) बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव फार लांबला नाही. अखेर बुमराने आफ्रिकेचे शेपूट कापून काढत यजमानांचा डाव 194 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून बुमराने पाच, भुवनेश्वरने तीन तर इशांत आणि शमीने प्रत्येकी एक बळी टिपला. दक्षिण आफ्रिकेकडून आमलाने एकाकी झुंज देताना 61 धावांची खेळी केली.