Join us  

धोनीलाही जे जमलं नाही ते विराटसेनेनं केलं

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं सलग आठ कसोटी सामन्यात विजयश्री मिळवत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 9:11 PM

Open in App

कोलंबो, दि. 6 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं सलग आठ कसोटी सामन्यात विजयश्री मिळवत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. माजी कर्णधार एम.एस. धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षापूर्वी विराटकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली होती. त्यावेळी त्याच्या आक्रमक स्वभावामुळे त्याला हा काटेरी मुकुट सांभाळता येणार नाही असे अनेक दिग्गज खेळाडू आणि क्रीडा समिक्षकांनी अंदाज व्यक्त केला होता. पण सर्व मान्यवरांचा अंदाज चुकीचा ठरवत कोहलीनं एकामागून एक कसोटी मालिका जिंकत नवा विक्रम आपल्या नावं केला आहे.लंकेबरोबरच्या या कसोटी मालिका विजयासह भारतीय संघाने सलग जास्त वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सर्वाधिक वेळा सलग कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड भारताच्या पुढे आहेत. इंग्लंडने 1884 ते 1898 या काळात सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तर त्यानंतर जवळपास 116 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात 2005-06 ते 2008 या काळात सलग 9 कसोटी मालिकांवर आपलं नाव कोरलं. आता सलग 8 कसोटी मालिका जिंकून भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.2015 मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरुन या विजय रथावर स्वार झाला. त्यानतंर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि आता पुन्हा श्रीलंकेला भारताने पराभवाची धूळ चारली आहे.लंकेबरोबरची तीन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. या मालिकेती एक कसोटी अद्याप बाकी आहे. दोन्ही कसोटीमध्ये भारतीय संघाने लंकेवर निर्धारित वर्चस्व गाजवले. पहिल्या कसोटीत धवन, विराट, पुजारा, अश्विन यांनी तर दुसऱ्या कसोटीत अश्विन, जडेजा, रहाणे आणि पुजारानं विजयी खेळी साकारल्या. लंकेबरोबरच्या दोन्ही सामन्यात भारताने सांघिक खेळाच्या बळावर विजश्री खेचून आणली.