Virender Sehwag Team India: ICC World Cup 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. संपूर्ण विश्वचषक भारतात खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. वीरेंद्र सेहवागने एक भविष्यवाणी केली आहेत. यंदाच्या विश्वचषकात कोणता खेळाडू सर्वाधिक शतके झळकावू शकेल आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करेल याबद्दल त्याने अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हा खेळाडू इतर कोणत्याही संघाचा नसून भारताचाच असेल अशी मोठी भविष्यवाणी सेहवागने केली आहे.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला आशा आहे की विराट कोहली विश्वचषकात अनेक शतके झळकावेल आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. 2011, 2015 आणि 2019 नंतर विराट कोहली चौथा एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 2019 च्या विश्वचषकात कोहलीने 9 डावात 55.37 च्या सरासरीने 443 धावा केल्या, ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. सेहवागने क्रिकबझला सांगितले की, 'विराट कोहलीने २०१९ विश्वचषकात एकही शतक झळकावले नाही. या वर्षी मला आशा आहे की तो अनेक शतके झळकावेल आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. आशा आहे की भारत विश्वचषक जिंकेल आणि नंतर, मला त्याला माझ्या खांद्यावर घेऊन मैदानात फिरायचे आहे. जसे सचिन तेंडुलकरच्या काळात झाले होते.
2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य सेहवाग म्हणाला की कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा आगामी स्पर्धा जिंकण्यासाठी पात्र आहेत. 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग म्हणून रोहितला मुकावे लागले होते आणि आता टूर्नामेंट मायदेशात असताना तो संघाचा कर्णधार आहे ही मोठी बाब आहे. सेहवाग म्हणाला, "हे दोन (रोहित आणि कोहली) वरिष्ठ खेळाडू विश्वचषक जिंकण्यासाठी पात्र आहेत. रोहित शर्मा 2011 च्या विश्वचषकासाठी निवड होण्याच्या अगदी जवळ होता पण तो हुकला. नंतर तो ODI चा बादशाह बनला. आता त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नक्कीच विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यास पात्र आहे कारण तो एक प्रतिभावान खेळाडू आणि हुशार कर्णधार आहे."
दरम्यान, भारताचा यंदाच्या विश्वचषकातील सलामीचा सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत होणार आहे. सर्वाधिक विश्वचषक जिंकणाऱ्या संघापासून सुरू होणारा भारताचा प्रवास विश्वचषक उंचावूनच संपावा, अशी इच्छाही सेहवागने व्यक्त केली आहे.