नवी दिल्ली : लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात यजमान गुजरातच्या संघाने बाजी मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय लखनौला आंगलट आल्याचे पाहायला मिळाले. गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी शानदार खेळी केली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद तब्बल २२७ धावा केल्या. गिल नाबाद (९४) आणि साहा (८१) या दोघांनी पाहुण्या संघासमोर धावांचा डोंगर उभारला.
२२८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौने अप्रतिम सुरूवात केली होती. क्विंटन डिकॉक (७०) आणि कायल मेयर्स (४८) यांनी सामन्यात चुरस आणली होती. नवव्या षटकात कायल मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुडा खेळपट्टीवर आला. यानंतर लखनौची धावगती मंदावली आणि संघावर दबाव वाढत गेला. हुडा सध्या फॉर्ममध्ये दिसत नाही. पहिल्या ९ सामन्यात त्याने केवळ ५३ धावा केल्या. त्याचबरोबर निकोलस पूरन आणि आयुष बडोनी हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण लखनौच्या व्यवस्थापनाने दीपक हुडावर विश्वास दाखवला. याचाच दाखला देत भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने लखनौच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला आहे, ज्याचा गौतम गंभीर महत्त्वाचा हिस्सा आहे.
"पराभव तेव्हाच निश्चित झाला"
वीरेंद्र सेहवागने म्हटले, "लखनौने दहा षटकांनंतर एक गडी गमावून १०२ धावा केल्या होत्या. या धावसंख्येनंतर त्यांनी सामना एवढ्या मोठ्या फरकाने गमावला नसता. पहिला गडी तंबूत परतल्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला पाठवायला हवे होते, असे माझे मत आहे. निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, स्वतः कर्णधार कृणाल पांड्या किंवा चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वेगवान धावा करणारा आयुष बडोनी हे या जागी खेळू शकले असते. पण कोण आले…दीपक हुडा, जो सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे." दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनौने सामना गमावला असे वीरूने अधिक सांगितले, तो क्रिकबजशी बोलत होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Virender Sehwag criticizes Gautam Gambhir along with team management after Lucknow Super Giants defeat in lsg vs gt match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.