ICC odi world cup 2023 : गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर विश्वचषकातील सलामीचा सामना खेळवला जात आहे. उद्घाटनाच्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आहेत. पण, पहिल्याच सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने बीसीसीआयसह आयसीसीची चिंता वाढल्याचे दिसते. याचाच दाखला देत नेटकरी यजमानांची फिरकी घेत आहेत. अशातच भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी व्यवस्थापनाला एक अजब सल्ला दिला आहे. भारतीयांना रस नसलेल्या सामन्यांसाठी शाळा आणि कॉलेजच्या मुलांसाठी मोफत तिकीट असावे, अशी मागणी वीरूने केली आहे.
सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "ऑफिसच्या वेळेनंतर जास्त लोक येतील अशी आशा आहे. पण भारतीयांना रस नसलेल्या सामन्यांमध्ये शाळा आणि कॉलेजच्या मुलांसाठी मोफत तिकीट असावे. ५० षटकांच्या सामन्यातील आवड कमी झाल्याने, युवकांना विश्वचषकातील सामन्याचा अनुभव घेण्यास आणि खेळाडूंना भरपूर प्रेक्षकांसमोर खेळण्यास मदत होईल."
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या उद्घाटनाच्या सामन्यातील रिकाम्या स्टँडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेगा क्रिकेट इव्हेंटमध्ये प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे नेटकरी बीसीसीआयला लक्ष्य करत आहेत. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे रिकामे दिसत आहे. सामन्याच्या तिकिटांची विक्री न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. खरं तर अहमदाबादमधील या स्टेडियमची एकूण १.३ लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.
विश्वचषकाचा श्रीगणेशाआजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या सामन्यातच गतविजेत्या इंग्लिश संघाला झटका बसल्याचे दिसते. कारण अष्टपैलू बेन स्टोक्स आजच्या सामन्याला मुकणार आहे. दरम्यान, विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कार्यवाहक कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात खेळत नाही. लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे बाहेर आहे.