भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नेहमी चालू घडामोडींवर भाष्य करणारा सेहवाग अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता पुन्हा एकदा वीरू त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टवर व्यक्त होताना त्याने त्याच्या स्टाफमधील सदस्याचा किस्सा सांगितला. मात्र त्याने काही वेळातच ही पोस्ट डिलीट केल्याने चर्चांना उधाण आले. वीरुने त्याच्या स्टाफमधील सदस्य आणि शेअर बाजारातील परिस्थितीवर भाष्य केले.
सेहवागने लिहिले की, माझ्या स्टाफमधील एक सदस्य आहे, ज्याने जमीन विकून एक कोटी रुपये गोळा केले. मोदींच्या पोस्टनंतर त्याने कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेच्या शेअर्समध्ये ८० लाख रुपये गुंतवले. या बँकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून हाईलाईट केले होते. पण, तीन महिन्यातच हे सर्व शेअर्स पडले आणि २० टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. या बँकांच्या शेअर्सच्या किमतीत झालेली घसरण अनपेक्षित होती, विशेषत: त्याच कालावधीत निफ्टी निर्देशांकात १०% ने वाढ झाली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात बँकांबद्दल एक पोस्ट केली होती. याचाच दाखला देत वीरेंद्र सेहवागने संबंधित स्टाफचे उदाहरण देत किस्सा सांगितला. पण, अनेकांनी ट्रोल केल्यानंतर त्याला ही पोस्ट डिलीट करावी लागली. शेअर्स पडल्यामुळे त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात. PSU X Premia बँकांवर विश्वास ठेवायचा की नाही... त्यांचे सर्व शेअर्स सतत पडत असतात असाही तो विचार करतो. तो आजही मोदीजींचे शब्द आठवतो पण बाजारात होणारे नुकसान समजू शकत नाही. तज्ञ मंडळी त्याला काय सल्ला देणार? कारण तो घाबरला आहे कारण त्याने त्याच्या नेटवर्थचा मोठा भाग गुंतवला आहे, असेही सेहवागने नमूद केले.