Virender Sehwag and virat kohli : भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद का नाकारले याबाबत वीरेंद्र सेहवागने भाष्य करून सर्वांचे लक्ष वेधले. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. तेव्हा वीरूला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने ती नाकारली. यामागे वीरेंद्र सेहवागने मोठे कारण सांगितले आहे.
खरं तर 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्याचवेळी अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
वीरूने प्रशिक्षकपदाबाबत केला मोठा खुलासा
सेहवागच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली आणि अमिताभ चौधरी यांनी त्याला फोन केला आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात सामील होण्यास सांगितले होते. न्यूज 18 या वृत्तवाहिनीशी बोलताना सेहवागने म्हटले, "विराट कोहली आणि बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अमिताभ चौधरी यांनी मला सांगितले नसते तर मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज देखील केला नसता. आमची बैठक झाली आणि अमिताभ चौधरी यांनी मला सांगितले की, कोहली आणि कुंबळे यांच्यात काही मतभेद आहेत आणि म्हणूनच तू प्रशिक्षक व्हावे अशी आमची इच्छा आहे. तसेच त्यांनी म्हटले की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 नंतर कुंबळेचा कार्यकाळ संपेल आणि त्यानंतर तू संघासोबत वेस्ट इंडिजला जाऊ शकतोस. मी तेव्हा यासाठी होकार किंवा नकारही दिला नाही. मी म्हटले की मी वेस्ट इंडिजला जाईन पण मला असिस्टंट कोच, बॉलिंग कोच, बॅटिंग कोच आणि फिल्डिंग कोच यांसह कोचिंग स्टाफ माझ्या मर्जीचा असावा. मात्र, मला माझ्या आवडीचा कोचिंग स्टाफ निवडण्याची परवानगी नव्हती आणि त्यामुळेच मी वेस्ट इंडिजचा दौराही केला नाही."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"