मुंबई- टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. सध्या टीममध्ये एकही असा खेळाडू नाही जो विराटसमोर डोक वर काढून पाहू शकेल आणि त्याला त्याची चूक सांगेल. सेहवागने याआधी विराट कोहलीवर टीम सिलेक्शनवरूनही टीका केली होती. इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात सेहवाग म्हणाला,'विराट कोहलीला मैदानात त्याच्या चूका सांगणारा एखादा खेळाडू टीममध्ये हवा, असं मला वाटतं. प्रत्येक टीममध्ये चार-पाच असे खेळाडू असतात जे कॅप्टनला सल्ले देतात. तेच खेळाडू कॅप्टनला मैदानाच चूका करण्यापासून रोखतात. सध्या टीममध्ये असा कुठलाही खेळाडू नाही जो विराट कोहलीला चुकीचे निर्णय घेण्यापासून रोखू शकेल. टीमचे मुख्य कोच नक्कीच विराटला सल्ले देत असतील. जर टीममध्ये काही मतभेद असतील तर ते सपोर्ट स्टाफसह सगळ्यांनी बसून दूर करावेत'.
टीममधील खेळाडूंकडून विराटला ज्या अपेक्षा आहेत त्यामुळे विराटची कॅप्टनसी प्रभावित होते. विराट कोहली आता अशा स्तरावर आहे जेथे तो प्रतिकूल परिस्थितीतही खेळू शकेल. तशीच अपेक्षा तो टीम इंडियाकडूनही ठेवतो. विराट ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर आत्तापर्यंत टीममधील कुठलाही खेळाडू पोहचलेला नाही. त्याचाच परिणाम विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर झाला आहे.
विरेंद्र सेहवागने पुढे म्हंटलं, टीममधील बाकी खेळाडूंनी आपल्या प्रमाणे बेडर होऊन खेळावं असं विराटला वाटतं. कोहलीप्रमाणे इतरांनीही रन्स करावे, असं त्याला वाटतं. यामध्ये चुकीचं काहीही नाही. सचिन तेंडुलकर कॅप्टन असताना तोही सहखेळाडूंना रन्स करायला सांगायचा.
दरम्यान, मंगळवारी विराट कोहलीने म्हंटलं की दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या टीमवर तो खूश आहे. टेस्ट सिरीजमध्ये जालेला पराभव हा टीमच्या चुकांमुळे झाला हेही विराटने मान्य केलं.