Join us  

धोनी की कोहली; तुझ्या मुलांनी कोणासारखं बनावं? वीरेंद्र सेहवाग म्हणतो...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी कारकिर्दीनंतर वीरेंद्र सेहवाग सामाजिक सेवेत गुंतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:20 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी कारकिर्दीनंतर वीरेंद्र सेहवाग सामाजिक सेवेत गुंतला आहे. भारतीय संघाच्या या माजी स्फोटक फलंदाजानं भल्याभल्यांची पळताभूई करून सोडली. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता समाजाला काही तरी दिलं पाहिजे, असं त्याचं प्रांजळ मत आहे. यशस्वी क्रिकेटपटू झाल्यानंतर मुलांसाठी शाळा बांधावी असं त्याच्या वडिलांच स्वप्न होतं आणि त्यानं तेही करून दाखवलं.  

तो म्हणाला,''मी आता जे काही आहे, ते सर्व मला क्रिकेटनं दिलं आहे. दिल्ली लीगमध्ये खेळण्यासाठी मी अनेक तासांचा प्रवास करायचो. क्रिकेटनं मला दोन वेळचं अन्न दिलं आणि आता समाजासाठी काही करण्याची वेळ आली आहे. मी यशस्वी क्रिकेटपटू झाल्यानंतर एक शाळा बांधावी;  त्यात मुलं अभ्यास करतील, राहतील आणि खेळतील, हे माझ्या वडीलांचे स्वप्न होतं. आम्ही आयुष्यात हालाकिचे दिवस पाहिले आहेत आणि आता मी वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. माझ्या शाळेतील मुलांपैकी कोणीतरी IITमध्ये जावं, प्रसिद्ध डॉक्टर बनावं किंवा भारतासाठी खेळावं, तेव्हाच मी समाजासाठी काही तरी करू शकलो याचं समाधान वाटेल.''

पण, याचवेळी त्याच्या मुलानं काय बनावं, हेही वीरूनं सांगितलं. तो म्हणाला,''माझ्या मुलानं आणखी एक वीरेंद्र सेहवाग बनू नये.''  सेहवागला दोन मुलं आहेत. आर्यवीर (12) आणि वेदांत ( 9) अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांनी वीरू बनण्यापेक्षा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली किंवा हार्दिक पांड्या सारखं बनावं, असं सेहवाग म्हणाला. पण, हा निर्णय त्यांचा आहे, असंही त्यानं स्पष्ट केलं. 

तो म्हणाला,''मला त्यांच्यात दुसरा वीरेंद्र सेहवाग पाहायचा नाही. त्यांनी विराट कोहली, हार्दिक पांड्या किंवा महेंद्रसिंग धोनीसारखं बनावं, परंतु त्यांना क्रिकेटपटू बनायचं नाही. त्यांना त्यांची कारकीर्द निवडण्याची मोकळीक आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सदैव त्यांना मदत करेन. यापलीकडे त्यांनी एक चांगला माणूस बनावं आणि त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.''

टॅग्स :विरेंद्र सेहवागमहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीहार्दिक पांड्या