Virender Sehwag on Yuzvendra Chahal statment : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचा TRP घसरला असताना गुरुवारी युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal ) एका विधानाने सर्वांना धक्का दिला. २०१३च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या एका मद्यधुंद खेळाडूने आपल्याला १५व्या मजल्यावर लटकवले होते आणि त्यात माझा जीवही गेला असता, असा धक्कादायक प्रसंग चहलने सांगितला. शुक्रवारी सोशल मीडियावर चहलच्या या भयानक किस्स्याचीच चर्चा सुरू आहे आणि त्यात आता माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याने उडी घेतली आहे. वीरूने एक पोस्ट लिहून या प्रकरणाचा तपास व्हायला हवा असे मत व्यक्त केले आहे.
यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चहलच्या नावावर आयपीएलमध्ये ११९ सामन्यांत १३९ विकेट्स आहेत. २०१३ ते २०२१ हा बराच मोठा काळ तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. पण, आयपीएलमध्ये त्याची सुरूवात ही मुंबई इंडियन्सकडून झाली होती. २०११मध्ये चहलने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्यानेही केवळ १ सामना खेळला, परंतु २०११च्या चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२०त तो सर्व सामने खेळला.चहलने गुरुवारी आर अश्विनसह मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी त्याने मुंबई इंडियन्ससोबत असताना घडलेला एक भयानक किस्सा सर्वांना सांगितला. तो म्हणाला,''हॉटेलच्या १५व्या मजल्यावरून MIच्या खेळाडूने मला सोडले असते किंवा जर त्याची माझ्या मानेवरील पकड सुटली असती तर मी सरळ खाली पडलो असतो. नशिबाने तेथे अन्य लोकं आली आणि मला वाचवले. मला चक्कर आली आणि लोकांनी मला पाणी दिले.''
कुठेही गेल्यावर माणसं किती जबाबदार असणं गरजेचं आहे हे त्याला तेव्हा जाणवलं. चहल म्हणाला की, त्याला वाटले की मी थोडक्यात वाचलो. जर मद्यधुंद खेळाडूने चूक केली असती तर तो १५ मजल्यावरून खाली पडला असता.