ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघाने वन डे विश्वचषक २०२३ मध्ये विजयी सलामी दिली. २०० धावांच्या आव्हानाच्या दिशेने वाटचाल करताना विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी अप्रतिम खेळी केली. सुरूवातीलाच तीन मोठे धक्के बसल्यानंतर किंग कोहलीने सावध खेळी करून डाव सावरला. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. मग राहुल-विराटच्या जोडीने कांगारूंना बळी घेण्यासाठी तरसवले. राहुलने विजयी षटकार लगावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, फलंदाजीसाठी खेळपट्टी कठीण वाटत असताना किंग कोहलीने सावध पवित्रा घेत डाव पुढे नेला. हळू हळू फलंदाजांना मदत मिळत गेली अन् विराटने संधी मिळताच मोठे फटकार खेळले. विराटच्या या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शायरीच्या माध्यमातून 'विराट' खेळीला दाद दिली.
सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "जहाँ मॅटर बड़े होते हैं वहाँ किंग कोहली खडे होते है... क्लास इनिंग." खरं तर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला चांगलाच संघर्ष करावा लागला. सुरूवातीलाच कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यरच्या रूपात तीन मोठे झटके बसल्यानंतर विराट-राहुलने डाव सावरला. पण, १२ धावांवर खेळत असताना विराटला एक झेल सुटला अन् भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला. मिचेल स्टार्कने कोहलीला आपल्या जाळ्यात फसवले पण मिचेल मार्शला झेल घेण्यात अपयश आले. १२ धावांवर झेल सुटल्यानंतर किंग कोहलीने कांगारूंना घाम फोडताना ८५ धावांची अप्रतिम खेळी केली. विराट कोहली (८५) आणि लोकेश राहुल नाबाद (८५) यांच्या सावध खेळीच्या जोरावर भारताने २०० धावांचे लक्ष्य सहज गाठले. ४१.२ षटकांत चार बाद २०१ धावा करून भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला.