रोहित नाईक
मुंबई : यंदा आयपीएलचे १५वे सत्र रंगणार असून महिली प्रीमियर लीगला ४ मार्चपासून सुरुवात होण्याआधीपासून क्रिकेटचाहत्यांना वेध लागले ते आयपीएलचे. आयपीएलच्या आगामी १५व्या सत्रानिमित्त वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि इरफान पठाण या माजी स्टार क्रिकेटपटूंनी मीडियाशी संवाद साधताना आपल्या आयपीएल आठवणींना उजाळाही दिला. यावेळी, सेहवागने आयपीएलच्या पहिल्या वहिल्या सामन्यात ब्रेंडन मॅक्क्युलमने झळकावलेल्या दीडशतकी खेळीमुळे सर्वांचे डोळे उघडले, असे म्हटले.
ब्रेंडन मॅक्क्युलमच्या पहिल्या सामन्यातील दीडशतकानंतर तुमच्या मनात कोणते विचार आले, असा प्रश्न सेहवागला 'लोकमत'च्या वतीने करण्यात आला. यावर सेहवाग म्हणाला की, ब्रेंडन मॅक्क्युलमच्या त्या तडाखेबंद दीडशतकानंतर फार विचार केला नव्हता. त्याआधी, मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकले होते आणि आता टी-२० क्रिकेटची वेळ होती. पण टी-२० मध्ये दीडशे धावांची खेळी करण्याबाबत विचार केला नव्हता. १६-१७ षटकांपर्यंत खेळलो, तर शतक ठोकू शकतो, असा विश्वास होता. पण मॅक्क्युलमच्या त्या दीडशतकाने सर्वांचे डोळे उघडले की टी-२० प्रकार आता कायम पुढेच राहणार.'
आयपीएलला १५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सेहवागसह हरभजन आणि इरफान यांनीही प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात हरभजनने जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर हे वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे ठरतील, असे म्हटले. तो म्हणाला की, 'बुमराह आणि आर्चर नक्कीच मुंबईसाठी निर्णायक ठरतील. आर्चर दुखापतीतून सावरला असला, तरी त्याने अद्याप पुरेसे क्रिकेट खेळलेले नाही. पण, तरी हे दोन्ही खेळाडू मोठ्या स्तराचे आहेत. कोणत्याही संघाकडे अशी घातक गोलंदाजी जोडी नाही. बुमराह-आर्चर यांच्या जोरावर अखेरच्या चार षटकात २० धावांचे संरक्षण करण्याचा विश्वासही संघ करु शकतो. पण हे सर्व त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे आणि येणाऱ्या वेळेनुसार हे कळेलच. पण, जर मी अजून मुंबईचा सदस्य असतो, तर नक्कीच दोघांना एकत्र गोलंदाजी करताना बघायला आवडले असते.'
इरफान म्हणतो, 'जिंकणार तर मुंबई इंडियन्स!'
यंदाच्या संभाव्य आयपीएल विजेता म्हणून सेहवाग आणि हरभजन यांनी अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांना पसंती दिली. यंदाचा विजेता नवा असावा, असे सेहवाग म्हणाला. मात्र, स्पर्धेतील तगडा संघ असल्याने मुंबई इंडियन्स जेतेपदाचा दावेदार असल्याचे इरफान पठाणने सांगितले. तो म्हणाला की, 'यंदा ज्याप्रकारे मुंबई इंडियन्सने आपला संघ बांधला आहे, ते पाहता त्यांच्याकडे जेतेपद जिंकण्याची संधी अधिक आहे. नक्कीच यासाठी जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह १०० टक्के तंदुरुस्त असले पाहिजे. तसेच, रोहित शर्मालाही फॉर्म गवसला पाहिजे. याशिवाय, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, डीवाल्ड ब्रेविस, कॅमरुन ग्रीन यांच्यामुळे मुंबईची बाजू जबरदस्त तगडी बनली आहे. त्यामुळेच हा संघ जिंकला नाही, तर चाहते खूप निराश होतील. असा संघ खूप वर्षांनी एकदा पाहण्यास मिळतो.'
Web Title: Virender Sehwag reminisced about IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.