नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ त्यांच्या मैदानावरील कामगिरीव्यतिरिक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत शेरेबाजी करण्यासाठीही ओळखला जातो. पण सध्या भारत दौ-यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून जास्त स्लेजिंग पाहायला न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची नजर इंडियन प्रीमियर लीगवर असल्याने त्यांनी विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंवर शेरेबाजी केली नाही असं भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.
''हैराण करणारी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांनी मालिका 0-3 ने गमावली होती तेव्हाही त्यांनी आक्रमक रूप दाखवलं नाही आणि 1-4 ने सपशेल पराभव झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही शेरेबाजी केली नाही'', असं सेहवाग इंडिया टीव्हीवरील शो ‘क्रिकेट की बात’मध्ये म्हणाला. ''ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शेरेबाजी नाही केली कारण धनलक्ष्मी (आयपीएल) हातातून निसटेल याची त्यांनी भीती वाटत होती. गैरव्यवहरामुळे आयपीएलद्वारे होणा-या रग्गड कमाईवर पाणी सोडावं लागेल आयपीएलचे संघ त्यांच्यावर बोली लावताना विचार करतील ...ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या बदललेल्या वृत्तीचं कदाचीत हे एक मुख्य कारण असू शकतं'' असं सेहवाग म्हणाला.
टीम इंडियाला घाबरला होता आमचा संघ - ऑस्ट्रेलियाच्या संघाला वन-डे सामन्यांच्या मालिकेत4-1 अशी हार पत्करावी लागली. भारतीय संघासमोर स्टिव्ह स्मिथचा ऑस्ट्रेलियाचा संघ तग धरू शकला नाही. संघातले बरेचसे खेळाडू हे भारताविरुद्ध खेळताना घाबरले होते, त्यांच्यावर मानसिक दबाव असल्यामुळे त्यांना हवीतशी कामगिरी करता आली नसल्याचं ऑस्ट्रेलियाचे हंगामी प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांनी म्हटलं आहे.
“खेळाडूंच्या वैय्यक्तीक क्षमतेबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. पण भारताविरुद्ध खेळताना आमचे खेळाडू काहीसे घाबरलेले होते, जे आम्हाला होऊ द्यायचं नाहीये. प्रत्येक खेळाडूला आपलं म्हणणं मांडण्याची मुभा आहे. पण सतत पराभव पदरी पडला तर तुमच्या खेळात एक नकारात्मकता येते. आमच्या खेळाडूंच्या बाबतीतही नेमकं हेच झाल्याचं सेकर म्हणाले”.