इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन किंवा पदार्पण करण्यासाठी बरेच खेळाडू प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत या प्रयत्नवीरांपैकी काहींना यश आले, तर काही अपयशी ठरले. त्या अपयशी ठरणाऱ्यांमध्ये एक नाव जे सर्वांच्या चांगल्याच ओळखीचे आहे आणि ते म्हणजे पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw)... दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा हा सलामीवीर काहची चुकीचा फटका मारून स्वस्तात माघारी परतला अन् दिल्लीचा माजी कर्णधार व भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) संतापला.. त्याने पृथ्वीला कडवट बोल बोलून दाखवले.
लाल परी! GT vs DC मॅचमध्ये दिसली मिस्ट्री गर्ल, क्रिकेटपटूशी नातं
दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी त्यांचा दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ ७ धावा करून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पूल मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पृथ्वी शॉचे वर्णन वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचे मिश्रण म्हणून केले होते. पण, पृथ्वीचा फॉर्म त्यानंतर घसरला अन् तो टीम इंडियाबाहेरच गेला. तो क्रिकेटपेक्षा अन्य वादांमुळेच अधिक चर्चेला गेला. नुकतंच त्याचं अन् भोजपूरी अभिनेत्रीचं भांडण, गाजलं होतं.
पृथ्वी टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु त्याला ती जुनी लय सापडताना दिसत नाही. वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'पृथ्वी शॉने अनेकदा असेच शॉट्स खेळून आपली विकेट गमावली आहे. पण त्याने चुकांतून धडा घेण्याची गरज आहे. हे योग्य नाही का? तुम्ही शुभमन गिलकडे बघा. तो पृथ्वीसोबत १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला आणि आता तो भारताच्या सीनियर संघाकडून कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. मात्र आयपीएलमध्ये पृथ्वीचा संघर्ष सुरूच आहे.''
वीरू पुढे म्हणाला, 'पृथ्वी शॉने आयपीएल प्लॅटफॉर्म वापरून जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत. ऋतुराज गायकवाडने एका मोसमात ६०० हून अधिक धावा केल्या. शुभमन गिलनेही खूप धावा केल्या. त्यामुळे अशा परिस्थितीत पृथ्वी शॉला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"