नवी दिल्ली : रविवारी टी-20 विश्वचषकाचा अखेरचा सामना पार पाडला. इंग्लिश संघाने 5 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला आणि विश्वचषकाचा किताब पटकावला. भारतीय संघाला या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघ टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या आगामी मालिकेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे.
दरम्यान, 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. 18 तारखेपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. खरं तर भारतीय संघ न्यूझीलंडच्या धरतीवर एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. मात्र एकाही मालिकेसाठी संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉला संधी मिळाली नाही. यावरूनच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे.
वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी बोलताना म्हटले, "एक नाव आहे जे मला भारतीय संघात पाहायचे आहे, ते म्हणजे पृथ्वी शॉ. त्याला टी-20 आणि एकदिवसीय यातील एकाही मालिकेत संधी मिळाली नाही. तो कसोटी क्रिकेट देखील खेळला नाही, बिचारा बाहेर झाला आहे. आगामी काळात त्याला मला भारतीय संघात खेळताना पाहायचे आहे. आता 2023चा विश्वचषक आहे त्यामुळे आगामी काळात तो नक्कीच संघात दिसेल अशी आशा आहे."
पृथ्वी शॉ टी-20चा सर्वोत्तम खेळाडू सेहवागने भारताच्या युवा खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले आहे. "पृथ्वी शॉ असा खेळाडू आहे जो टॉप ऑर्डरमध्ये खेळतो. त्याचा स्ट्राईक रेट 150च्या जवळपास आहे. टी-20 क्रिकेटसाठी तो सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यामुळे तुम्ही त्याला एक अतिरिक्त खेळाडू म्हणून खेळवू शकतात", अशा शब्दांत वीरेंद्र सेहवागने पृथ्वीला संघात स्थान देण्याची मागणी केली आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी टी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"