नवी दिल्ली : आयुष्यात सारेच खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. पण प्रत्येकाला आयुष्यात खरं प्रेम मिळतंच असं नाही. काही जणं आयुष्यभर खरं प्रेम शोधत राहतात, पण त्यांना ते मिळत नाही. काहींना खरं प्रेम मिळतंही, पण त्या व्यक्तीचा सहवास फार जास्त काळ मिळत नाही. अशीच एक अधुरी प्रेम कहाणी भारताचा माजी तडफदार सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सांगतोय.
आपल्या आवडत्या क्यक्तीबरोबर राहण्यात सुख असतं, असं म्हणतात. पण ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तरी तिची आठवण प्रत्येक क्षणाला आल्यावाचून राहत नाही. ती व्यक्ती या जगात नसली तरी आपल्या मनात घर करून असते. प्रत्येक वेळी तिचा चेहरा आपल्या डोळ्यापुढे असावा, असं वाटत राहतं. अशीच एक गोष्ट सेहवागने आपल्या ट्विटरवर मांडली आहे. सेहवागने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि खरं प्रेम नेमकं काय असतं, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या पोस्टमध्ये एका वृद्ध माणसाचा फोटो टाकला आहे. यामध्ये हा वृद्ध माणूस एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ खात आहे. पण त्याचवेळी त्याने आपल्या बायकोचा फोटो टेबलवर ठेवला आहे. त्याची पत्नी या जगात नाही आणि तो त्या वृद्ध माणसाला प्रत्येक क्षणी आपल्या पत्नीची आठवण येत आहे, असं या फोटोमध्ये दिसत आहे. माणसाला आयुष्यात खऱ्या प्रेमाची किती गरज आहे, असं सेहवागने म्हटले आहे.