नवी दिल्ली-
वीरेंद्र सेगवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटून निवृत्ती घेऊन ९ वर्ष लोटली आहेत. पण आजही त्याच्यासारखा सलामीवीर फलंदाजाचा पर्याय भारतीय संघाला शोधता येऊ शकलेला नाही. आजही सेहवागच्या बिनधास्त फलंदाजीचे दाखले दिले जातात. वीरेंद्र सेहवागनं आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं वनडे असो किंवा मग कसोटी सामना भारतीय संघाच्या ओपनिंगमध्ये क्रांती घडवली होती. सेहवागनं कसोटी क्रिकेटमध्येही अनेक लक्षवेधी खेळी साकारल्या आहेत. यात दोन त्रिशतकं आणि काही द्विशतकांचा समावेश आहे. एकंदर सेहवागच्या फलंदाजीचा अंदाजच वेगळा होता.
आजही जेव्हा एखादा युवा फलंदाज स्फोटक फलंदाजी करायला लागतो तेव्हा त्याची तुलना सेहवागशी केली जाते. सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या दोनच खेळाडूंची सेहवागशी सर्वाधिक तुलना केली जाते. मात्र, सध्याच्या भारतीय सेटअपमध्ये त्याच्या फलंदाजीच्या शैलीशी बरोबरी साधणारा एकही खेळाडू नाही, असं स्वत: सेहवागनं म्हटलं आहे.
"मी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो, तिथे चौकार मारून धावा काढण्याची माझी मानसिकता होती. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच साच्याने खेळायचो आणि मला शतक करण्यासाठी आणखी किती चौकार लागतील हे मोजायचो. जर मी ९० धावांवर असलो आणि शतक पूर्ण करण्यासाठी १० चेंडू घेतले तर प्रतिस्पर्धी संघाकडे मला बाद करण्यासाठी १० चेंडू आहेत, असा विचार मी करायचो. त्यामुळेच मी चौकार मारत असे", असं सेहवाग एका कार्यक्रमात म्हणाला.
सेहवाग पुढे म्हणाला, 'मला वाटत नाही की भारतीय संघात माझ्यासारखी फलंदाजी करू शकेल असा एकही खेळाडू आहे. पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत हे दोन खेळाडू माझ्या मनात येतात. ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने मी फलंदाजी करायचो त्यापेक्षा थोडा जवळ आहे, पण तो ९०-१०० धावांवर समाधानी असतो आणि मी २००, २५० आणि ३०० धावा करायचो"