DC vs RCB । बंगळुरू : आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (DC vs RCB) दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. खरं तर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वातील दिल्लीचा या स्पर्धेत सलग पाचवा पराभव झाला आहे. आरसीबीने घरच्या मैदानावर २३ धावांनी विजय मिळवून चाहत्यांना खुशखबर दिली. अशातच दिल्लीच्या सततच्या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग दिल्लीच्या प्रशिक्षकावर संतापल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, दिल्लीच्या खराब कामगिरीची जबाबदारी प्रशिक्षक रिकी पाँटिंगने घ्यायला हवी असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. "जेव्हा दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याचे श्रेय प्रशिक्षक रिकी पॉंटिंगला दिले जात होते. त्यामुळे दिल्ली आता खराब कामगिरी करत आहे तेव्हा याची देखील जबाबदारी प्रशिक्षकाने घ्यायला हवी", असे वीरूने क्रिकबजशी बोलताना म्हटले.
वीरूचा पॉंटिंगवर टीकेचा बाण
प्रशिक्षकांच्या भूमिकेवर बोलताना सेहवागने म्हटले, "मी या आधी देखील सांगितले आहे की, प्रशिक्षक काहीच करत नाहीत त्यांची भूमिका शून्य असते. ते फक्त व्यवस्थापन करण्यासाठी असतात. खेळाडूंना आत्मविश्वास देतात पण संघाने चांगली कामगिरी केली तरच प्रशिक्षकाची भूमिका समोर येते, जे अनेकवेळा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने केले नाही. त्यामुळे पॉंटिंगने याची जबाबदारी घ्यायला हवी."
दिल्लीचा सलग पाचवा पराभव
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दिल्लीचा पाचवा सामना आरसीबीसोबत झाला. खरं तर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीने २३ धावांनी विजय मिळवून दिल्लीला आणखी एक धक्का दिला. आता दिल्लीचा पुढीला सामना २० एप्रिल रोजी कोलकात नाईट रायडर्सविरूद्ध होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Virender Sehwag slams coach Ricky Ponting after Delhi Capital fifth consecutive defeat in IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.