virender sehwag on david warner । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने डेव्हिड वॉर्नरवर टीकास्त्र सोडले आहे. राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात वॉर्नरने केलेल्या धिम्या खेळीवर वीरू चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. खरं तर ८ तारखेला राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs RR) यांच्यात गुवाहाटी येथे सामना पार पडला. राजस्थानने आपल्या घरच्या मैदानावर वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला.
राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल (६०) आणि जोस बटलर (७९) या सलामी जोडीने शानदार कामगिरी केली. सलामीवीरांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीसमोर १९९ धावांचा डोंगर उभारला २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीला ट्रेन्ट बोल्टने पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. पृथ्वी शॉला बाद करून बोल्टने शानदार सुरूवात केली. त्यानंतर कर्णधार वॉर्नरने ललित यादवसोबत ६४ धावांची भागीदारी नोंदवली आणि अर्धशतकी खेळी (६५) केली, मात्र तो संघाला विजयी करू शकला नाही. यावरूनच आता वीरूने त्याच्यावर टीका केली आहे.
वीरू संतापलावीरेंद्र सेहवागने म्हटले, "मला वाटते की, आता वेळ आली आहे की आपण इंग्रजीत बोलले पाहिजे. जेणेकरून आपण बोललेले वॉर्नरने ऐकावे आणि त्यातून काहीतरी धडा घ्यावा. डेव्हिड, जर तू आम्हाला ऐकत असशील तर, कृपया चांगला खेळ. २५ चेंडूत ५० धावा, जैस्वालकडून काहीतरी शिक, त्याने २५ चेंडूत किती चौकार मारले. जर तू अशी खेळी करणार नसशील तर आयपीएल नको खेळूस."
"वॉर्नर जर ५५-६० धावा करण्यापेक्षा ३० धावा करून बाद झाला असता तर संघासाठी चांगले झाले असते. रोवमॅन पॉवेल आणि इशान पोरेल यांसारखे खेळाडू लवकर खेळपट्टीवर आले असते आणि कदाचित काहीतरी वेगळे झाले असते. त्या खेळाडूंसाठी काहीच चेंडू शिल्लक राहिले नव्हते", असे वीरूने अधिक सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे राजस्थान विरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभव पत्करावा लागला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"