Virender Sehwag slams Virat Kohli, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग जेतेपद पटकावण्याचं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व विराट कोहलीचं स्वप्न हे पुन्हा एकदा स्वप्नच राहिलं... आयपीएल २०२२च्या क्वालिफायर २ सामन्यात RCB कडून काहीच संघर्ष पाहायला मिळाला नाही. विराटने पुन्हा एकदा अपयशी कामगिरी केली आणि चाहत्यांना निराश केले. राजस्थान रॉयल्सने ( RR) हा सामना जिंकून १४ वर्षांनंतर आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला. विराट कोहलीवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग चांगलाच भडकला आणि त्याने जोरदार टीका केली. ''१४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दित जेवढ्या चुका केल्या नसतील तेवढ्या विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये केल्या,''अशी टीका वीरूने केली.
''विराटने सर्वांना निराश केले. महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मोठ्या सामन्यात मोठा खेळाडू खेळतो, परंतु त्यानं स्वतःलाच नव्हे तर RCBच्या सर्व चाहत्यांना निराश केले,''असे सेहवाग म्हणाला. दोन-अडीच वर्षांत विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. आयपीएल २०२२मध्ये त्याने १६ सामन्यांत २२.७३च्या सरासरीने ३४१ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. ''हा तो विराट नाही, ज्याला आपण सर्व ओळखतो. हा कोणतरी वेगळाच विराट या पर्वात खेळत होता. नाहीतर संपूर्ण कारकीर्दित जेवढ्या चुका त्याने केल्या नाहीत, तेवढ्या या एका पर्वात तो करून बसला,''असे वीरूने Cricbuzz सोबत बोलताना म्हटले.
तो पुढे म्हणाला,''जेव्हा तुम्ही धावा करत नसता, तेव्हा अशा चुका होता. या बॅड पॅचमधून बाहेर पडण्याचे तुम्ही विविध मार्ग अवलंबवता. आयपीएल २०२२मध्ये सर्व प्रकारे विराट कोहली बाद झाला. त्याने प्रत्येकाला निराश केले.''