बंगळुरू : आयपीएल 2018 मध्ये यंदा किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात एक असा युवा खेळाडू खेळताना दिसेल ज्याची एका विशेष बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत तुलना होते. हा खेळाडू म्हणजे हिमाचल प्रदेशचा मयांक डागर. टीम इंडियाचा हॅण्डसम हंक म्हणून विराट कोहली तर परिचीत आहेच. पण क्रिकेट विश्वातील नवा हॅण्डसम चेहरा म्हणून मयांक डागरच्या फिमेल फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या हटके अंदाजामुऴे त्याने सोशल साईट्सवर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या गुड लूक्समुळे जगभरातील तरुणी त्याच्यावर फिदा आहेत.
मयांकच्या बाबतीत आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तो भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागचा भाचा आहे. तो सेहवागच्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. सेहवाग आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाशी जोडला आहे. आयपीएलच्या लिलावात खेळाडू खरेदी करण्यामध्ये त्याची भूमिका महत्वाची होती. लिलावाच्या वेळी सेहवाग पंजाबची मालकीन प्रीती झिंटासोबत बसला होता आणि त्याच्या सल्ल्यानुसारच प्रीती खेळाडूंवर बोली लावत होती.
दरम्यान, प्रीती झिंटाने सेहवागचा भाचा मयांक डागरला 20 लाख रूपयांची बोली लावून आपल्या संघात खरेदी केले. मयांकने 2016 मध्ये भारताच्या अंडर-19 संघाचंही प्रतिनिधित्व केलं आहे. त्यावेळी अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला पण या सामन्यात मयांकने भेदक गोलंदाजी करताना 28 धावा देऊन तीन बळी टिपले होते. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने गोलंदाजी करणा-या मयांकने आतापर्यंत 11 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 176 धावा बनवल्या असून 30 विकेट देखील घेतल्या आहेत. याशिवाय 13 टी-20 सामन्यांत त्याच्या नावावर 12 विकेट जमा आहेत.
आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जयदेव उनाडकट भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेन उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलेलं आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथम कृष्णाप्पा हा खेळाडू 6 कोटी 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या.