Virender Sehwag son Aaryavir Viral Video: क्रिकेटच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे दोन भाऊ एकमेकांसोबत खेळले आहेत. तसेच पिता-पुत्राच्याही अनेक जोड्या क्रिकेट खेळताना दिसत आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही आयपीएलमध्ये पदार्पण करताना दिसला. त्याचबरोबर असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांची मुले आता हळूहळू क्रिकेटमध्ये येत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडचा मुलगा समित याच्या फलंदाजीबद्दल चर्चा झाली. त्यानंतर आता भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग देखील क्रिकेट खेळताना दिसला आणि त्याची चर्चा रंगली आहे.
भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या सेहवागचा मुलगा आर्यवीर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आर्यवीर त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. नुकताच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सेहवागचा मुलगा आर्यवीर मॅचची सुरुवात त्याच्याच स्टाइलमध्ये करताना दिसत आहे. आर्यवीर लहान खेळी खेळू शकला असला तरी त्याने कमी वेळ फलंदाजी करताना सेहवागसारखाच आक्रमक खेळ केल्याचे दिसले.
आर्यवीरने सेहवाग सारखाच पहिल्या चेंडूवर ठोकला चौकार
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी क्रीझवर यायचा तेव्हा त्याला पाहून गोलंदाजांना घाम फुटायचा. त्याच्या झंझावाती फलंदाजीने प्रत्येक गोलंदाज थक्क झाला होता. आता त्यांचा मुलगा आर्यवीरही त्याच विचारात असल्याचे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की, आर्यवीर १६ वर्षाखालील विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रा विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी आला होता. त्याने वीरेंद्र सेहवागच्या शैलीत चौकार मारून डावाची सुरुवात केली. या सामन्यात तो 25 धावा करू शकला आणि झेलबाद झाला.