IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ध्रुव जुरेलने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. तिसऱ्या दिवशी जुरेलने भारतासाठी पहिल्या डावात १४९ चेंडूत ६ चौकार आणि चार षटकारांसह ९० धावा केल्या. जुरेलची ही खेळी पाहून भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग खूपच प्रभावित झाला. त्याने जुरेलची स्तुती करताना सर्फराज खानवर निशाणा साधणारी पोस्ट लिहीली आणि त्यावर सोशल मीडियावर खळबळ उडाली.
ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांना राजकोट सामन्यादरम्यान टीम इंडियामध्ये एकत्र पदार्पण करण्याची संधी मिळाली. यावेळी राजकोटच्या मैदानात सर्फराज खानचे वडील दिसले आणि बीसीसीआय व मीडियानेही सर्फराजच्या डेब्यूला खूप हायप दिली. पण, दुसरीकडे नवोदित ध्रुवच्या पदार्पणाची फार चर्चा दिसली नाही. आता जुरेलची फलंदाजी पाहून सेहवागने या घटनेचा समाचार घेतला.
ट्विटचा संबंध सर्फराजला दिलेल्या मीडिया हाइपशी जोडण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने पुढील दोन ट्विटमध्ये पुन्हा स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, मी हे कोणाचाही अपमान करण्यासाठी लिहिलेले नाही. माझा विश्वास आहे की एखाद्या खेळाडूची प्रसिद्धी त्याच्या कामगिरीवर आधारित असावी. काही लोकांनी शानदार फलंदाजी केली आहे आणि काही लोकांनी अपवादात्मक गोलंदाजी केली आहे, परंतु त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. आकाश दीपने देखील आश्चर्यकारक कामगिरी केली आणि यशस्वी जैस्वाल संपूर्ण मालिकेत चमकदार आहे. सर्फराज आणि जुरेल यांनी राजकोटमध्ये मिळालेल्या संधीचे सोने केले. माझे म्हणणे आहे की सर्व खेळाडूंचा प्रचार समान असावा.
सेहवाग इथेच थांबला नाही आणि तिसऱ्या ट्विटमध्ये कुलदीप यादवबद्दल पोस्ट केले की, जेव्हा जेव्हा हाइपचा विचार केला जातो तेव्हा कुलदीप यादवला सर्वात कमी प्रसिद्धी मिळालेली असते. तो अनेक वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे, परंतु त्याला कधीही फॅन क्लब आणि लोकांकडून कोणतीही प्रसिद्धी मिळाली नाही. कुलदीपला आत्तापर्यंत जे काही श्रेय मिळाले आहे, ते त्याहूनही अधिक पात्र आहे.