अमिरेकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत भेटीवर आले आहेत. या भेटीत त्यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवरुन त्यांनी भारतीयांना संबोधित केले. संध्याकाळी त्यांनी ताजमहालला भेट दिली. यावेळी ट्रम्प यांनी इंस्टाग्रामवर एक मेसेज लिहिला आहे आणि तो मेसेज चांगलाच वायरल झाला आहे. या मेसेजमध्ये ट्रम्प यांनी भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले आहे. पण यामागचे वायरल सत्य आहे तरी काय, हे दस्तुरखुद्द सेहवागने सांगितले आहे.
भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील विविधतेत एकतेचा उल्लेख केला. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली या क्रिकेटपटूंसह बॉलिवूड आणि शोले, डीडीएलजे या सुप्रसिद्ध चित्रपटांचा उल्लेख करून उपस्थितांची मने जिंकली. पण, क्रिकेटच्या देवाचं नाव चुकीच्या पद्धतीनं उच्चारल्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्रम्प यांना ट्रोल केलं.
''काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी ह्युस्टन येथे आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत हाऊडी मोदी कार्यक्रमात फुटबॉल स्डेडियमवर करण्यात आले होते. आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्डेडियम असलेल्या मोटेरावर माझे स्वागत करण्यात आले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंची ओळख जगभरात आहे.'' असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांनी यावेळी सचिनच्या नावाचा उच्चार सुचीन असा केला.
ट्रम्प यांनी सचिनने नाव सुचीन असेल घेतले असले तरी त्यांनी सेहवागचे नाव आपल्या मेसेजमध्ये बरोबर लिहिले आहे. ट्रम्प यावेळी इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हणाले की, " भारतातील झझ्झर येथे सेहवाग स्कूल नावाची सर्वात सुंदर शाळा आहे. खेळ, शिक्षण आणि आपली स्वप्ने साकार करण्यासाठी ही एक चांगली जागा आहे."
ट्रम्प यांच्या मेसेजवर सेहवागने ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये सेहवाग म्हणाला आहे की, " पाहा ट्रम्प यांनादेखील हे माहिती आहे. माझ्यामते हा मेसेज फेक आहे, पण त्यामध्ये दिलेली माहिती मात्र सत्य आहे."
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात दिवाळी आणि होळी या सणांचाही उल्लेख केला. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच भारतातील विविधतेमधील एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्य यांचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिन्ही दलांच्या जवानांनी ट्रम्प यांना मानवंदना दिली. तसेच विविध राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमधून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली.