नवी दिल्ली - रणजी करंडक स्पर्धेमध्ये बडोद्याचा फलंदाज विष्णू सोलंकी याने झंझावाती फलंदाजी करताना १३१ धावांची शतकी खेळी केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो १३१ धावांवर नाबाद होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर बडोद्याने ४०० धावांच्या आसपास मजल मारली होती. दरम्यान, या शतकी खेळीनंतर त्याच्या जिगरबाज वृत्तीची करुण कहाणी समोर आली.
शतक पूर्ण केल्यानंतर विष्णूने कुठल्याही प्रकारचा आनंद व्यक्त केला नाही. त्याचं शरीर मैदानात होतं तर मन मात्र या जगात येऊन काही तासांतच जगाचा निरोप घेणाऱ्या मुलीजवळ होतं. त्याने काही दिवसांपूर्वी पिता आणि क्रिकेटपटूची भूमिका निभावली. भावूक क्षणीही त्याने संघासाठीच्या कर्तव्यामध्ये कुठलीही कसूर केली नाही.
विष्णूने आधी मुलीवर अंत्यसंस्कार केले. नंतर संघासाठीची जबाबदारी पार पाडण्यासाठी तो मैदानात उतरला. मात्र मुलीच्या निधनामुळे धक्का बसलेल्या विष्णू सोलंकीने चंदीगडविरुद्धच्या सामन्यात खेळताना झंझावाती खेळ केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्याने १६१ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी केली. काही दिवसांपूर्वीच विष्णूच्या नवजात मुलीचे निधन झाले होत. त्यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार झाले. अखेर संघाची साथ देण्यासाठी तो मैदानात उतरला.
११ फेब्रुवारी रोजी विष्णू सोलंकीला कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र २४ तासांतच त्याचा हा आनंद दु:खात बदलला. त्याला या नवजात मुलीच्या मृत्यूची दु:खवार्ता समजली. तेव्हा तो संघासोबत भुवनेश्वरमध्ये होता. त्यानंतर विष्णू मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी बडोद्यात आला. त्यानंतर तो अंत्यसंस्कार करून तीन दिवसांतच संघात परतला होता.