मुंबई : वसई तालुका कला-क्रिडा विकास मंडळाने तीसाव्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ३० व्या वसई तालुका कला-क्रिडा महोत्सव कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत बिपीन पांडे (यंगस्टार्स ट्रस्ट), श्रुति सोनवणे, डेव्हिड बोनल, जोनाथन बोनल (समाज उन्नती मंडळ), गणेश फडके (क्रिडा मंडळ वसई), प्रदिप कोलबेकर (यंगस्टार्स ट्रस्ट), विश्वनाथ देवरुखकर / हेमंत पालवणकर (समाज उन्नती मंडळ) ह्यांनी अनुक्रमे पुरुष ऐकरी, महिला एकेरी, सबज्युनिअर मुले एकेरी, ज्युनिअर मुले एकेरी, प्रौढ एकेरी, वरिष्ठ नागरिक, पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. यंगस्टार्स ट्रस्ट तर्फे पुरस्कृत करण्यात आलेली ही स्पर्धा गणपतराव वर्तक क्रिडा भवन, क्रिडा मंडळ वसई येथे वसई तालुका कॅरम असोसिएशन व पालघर जिल्हा कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने वसई तालुका कला-क्रिडा मंडळाने आयोजित केली होती.
अंतिम फेरीच्या सामन्यात बिनमानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्या बिपीन पांडेने पालघर जिल्हा विजेता आशुतोष गिरीचा संघर्षपूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीत २५-१६, ९-२५, २५-१२ असा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुरुषांचा अंतिम सामना उत्कंठापूर्ण आणि चुरशीचा झाला. पहिल्या गेममध्ये बिपीन पांडेने बचावात्मक खेळ करत पाचव्या बोर्डपर्यंत १६-१२ अशी आघाडी घेतली. नंतरचे दोन बोर्ड ७ आणि ४ गुण घेऊन पांडेने २५-१६ असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये गतविजेता आशुतोष गिरीने बचावात्मक व आक्रमक खेळाचे मिश्रण करत ६ व्या बोर्डापर्यंत २०-८ अशी आघाडी घेतली. सातवा बोर्ड बिपीन पांडेने १ गुण घेऊन ९-२० असा स्कोअर केला. शेवटच्या बोर्डात गिरीने पाचचा बोर्ड घेऊन २५-९ असा जिंकून १-१ ने बरोबरी केली. तिसऱ्या निर्णायक गेममध्ये पहिले दोन बोर्ड जिंकून गिरीने ५-० अशी आघाडी घेतली. नंतर बिपीन पांडेने आक्रमक पवित्रा घेत ७ व्या बोर्डपर्यंत १३-१२ अशी आघाडी घेतली. शेवटच्या बोर्डमध्ये १२ गुण घेऊन २५-१२ असा तिसरा गेम जिंकून बिपीन पांडेने पहिल्यांदाच विजेतेपदाला गवसणी घातली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या राजेश मेहताने नवोदित शशांक शिरोडकरवर २५-१९, १५-२५, २५-१६ अशी तीन गेम रंगलेल्या लढतीत मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले. महिला गटातील अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित समाज उन्नती मंडळाच्या राष्ट्रीय खेळाडू श्रुति सोनवणेने सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत समाज उन्नती मंडळाच्याच तिसऱ्या मानांकित राष्ट्रीय खेळाडू अंजली रोडियावर २५-६, २५-० अशी मात करत पहिल्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात अग्रमानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकिता हांडेने यंगस्टार्स ट्रस्टच्याच श्र्वेता गौडचा २५-०, २५-७ असा सरळ दोन गेममध्ये धुव्वा उडवित आपले वर्चस्व सिद्ध केले. सब-ज्युनिअर मुलांच्या गटात अग्रमानांकित नालासोपाऱ्याच्या समाज उन्नती मंडळाच्या जोनाथन बोनलने वसईच्या पार्थ चुडासमाचा २५-०, २५-० असा सहज सरळ दोन गेममध्ये मात करत आपल्या दुसऱ्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात वसईच्या दुर्वेश घाडीगावकरने यंगस्टार्स ट्रस्टच्याच ओवेस साथीचा २५-४, ४-२५, २५-२ असा तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. ज्युनिअर मुलांच्या अंतीम फेरीत अग्रमानांकित समाज उन्नती मंडळाच्या डेव्हिड बोनलने यंगस्टार्स ट्रस्टच्या नवोदित अश्मित भक्तचा संघर्षपूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीमध्ये ७-२५, २५-३, २५-७ अशी कडवी झुंज मोडीत काढून आपले वर्चस्व सिद्ध करत १८ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत पहिल्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसरे स्थान नालासोपाऱ्याच्या शुभम सिंगने पटकाविले.
प्रौढ गटाच्या (वय ५० वर्षांवरील) अंतिम फेरीच्या सामन्यात वसई क्रिडा मंडळाच्या दुसरा मानांकित माजी विजेता गणेश फडकेने माजी विजेता यंगस्टार्स ट्रस्टच्याच नवीन पाटीलचा १६-२५, २५-१५, २५-८ असे तीन गेममध्ये नमवित पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या दत्तू गड्डमने दोन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्याच दत्तात्रय कदमचा २५-१२, २५-१६ असे मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध केले. ज्येष्ठ नागरिक गटाच्या (वय ६० वर्षांवरील) अंतिम सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या प्रदिप कोलबेकरने वसई कला क्रिडा मंडळाच्या गणेश फडकेवर अटीतटीच्या दोन गेम रंगलेल्या लढतीत २५-१४, २५-१५ अशी मात करत दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या रमेश वाघमारेने तीन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्याच लक्ष्मण बारियाचा २५-२१, १८-२५, २५-२२ असा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बिगरमानांकित समाज उन्नती मंडळाच्या विश्र्वनाथ देवरुखकर / हेमंत पालवणकर यांनी अनुभवी यंगस्टार्स ट्रस्टच्या अनिल बोढारे / महेश कोरी यांचा २५-६, २५-१३ असा दोन गेम रंगलेल्या लढतीत मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या राजेश मेहता / शशांक शिरोडकर यांनी नालासोपाऱ्याच्याच आनंद विश्वकर्मा / भारत शिंदे यांचा २५-२४, २५-२० असा दोन गेम रंगलेल्या लढतीत कडवी झुंज मोडीत काढली.