कोलंबो, दि. 11 - श्रीलंकेचा सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव केल्यामुळे मनोबल उंचावलेला भारतीय क्रिकेट संघ सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. खेळाडू श्रीलंकेतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देताना दिसत आहेत. नुकतंच भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी ऐतिहासिक महत्व असलेल्या 'अशोक वाटिके'ला भेट दिली. खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये मोहम्मद शामी, उमेश यादव, वृद्धिमान साहा, के एल राहुल, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव दिसत आहेत. यावेळी काही खेळाडूंच्या पत्नीदेखील सोबत होत्या.
तिस-या कसोटीआधी भारतीय क्रिकेट संघ रिलॅक्स मूडमध्ये असून मजा मस्ती करताना दिसत आहेत. मोहम्मद शामीने ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर करत अशोक वाटिकेची माहिती दिली आहे. 'भारतीय क्रिकेट संघ अशोक वाटिकेत पोहोचला आहे, जिथे सीतेला बंदिस्त करुन ठेवण्यात आलं होतं', अशी माहिती मोहम्मद शामीने फोटोंसोबत दिली आहे. खेळाडूंनी सीता अम्मा मंदिरात जाऊन सीतेचे दर्शनही घेतले.
उमेश यादवनेही आपल्या पत्नीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अशोक वाटिकेत हनुमानाच्या विशाल पदचिन्हाजवळ उमेश यादव पत्नीसोबत पाया पडताना फोटोत दिसत आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने सहज जिंकले आहेत. जर पल्लेकलमध्ये १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यात यशस्वी ठरला, तर विदेशात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल.
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत विदेशात केवळ एकदा कसोटी मालिकेत ३ सामने जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत केवळ ५० वर्षांत या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी प्राप्त झाली नसून, विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने २०००मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने, तर २००४ व २०१०मध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला होता.
भारताने मायदेशात खेळताना यापूर्वी ३ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलेले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव केला. मोहंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघाने १९९३-९४ मध्ये इंग्लंड व श्रीलंका या संघांविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीपची नोंद केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.
सध्या सुरू असलेल्या मालिकेत भारताने गालेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी, तर कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव ५३ धावांनी पराभव केला. फॉर्मचा विचार करता, भारतीय संघ पल्लेकलमध्ये विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी होणार आहे.