लंडनमध्ये सुरू असलेल्या ब्लास्ट ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारी अविश्वसनीय झेल जगाने पाहिला... भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनेही या झेलची तुलना क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कॅच अशी केली. ससेक्स विरुद्ध हॅम्पशायर यांच्यातल्या या सामन्यातील हा झेल सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.. ससेक्सने ६ धावांनी हॅम्पशायरवर विजय मिळवला आणि अफलातून झेल घेणारा ब्रॅडली करी ( Bradley Currie) हा मॅन ऑफ दी मॅच ठरला. करीने केवळ अविश्वसनीय झेलच टिपला नाही, तर त्याने तीन विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करताना ससेक्सने ६ बाद १८३ धावा उभ्या केल्या. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर ऑली कार्टर ( ६४) आणि कर्णधार रवी बोपारा ( ३०) यांनी संघाच्या धावगतीला आकार दिला. त्यानंतर मिचेल बर्गेस ( २६) व डॅनिएल इब्राहिम ( १८) यांनी तळाला येऊन चांगली फटकेबाजी केली. प्रत्युत्तरात हॅम्पशायरला ९ बाद १७७ धावाच करता आल्या. हॅम्पशायचीही आघाडीची फळी अपयशी ठरली. जोएल विदर्ली ( ३३) व लिएम डॉसन ( ५९) यांनी चांगली लढत दिली. बेन्नी हॉवेल ( २५) खेळपट्टीवर असेपर्यंत हॅम्पशायरला विजयाची आस होती.
पण, करीने त्याचाच अफलातून झेल टिपला. १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टायमल मिल्सने टाकलेला चेंडू हॉवेलने टोलावलेला चेंडू सहज सीमापार जाईल असे वाटत असताना करी चित्त्याच्या वेगाने हवेत झेपावला अन् एका हाताने चेंडू टिपला. सीमारेषेच्या अगदी जवळ हे इतक्या वेगाने घडले की प्रथम कोणालाच विश्वास बसत नव्हता. प्रेक्षकही अवाक् झाले होते. पण, करीने हा झेल टिपला अन् सामना फिरला.