हैदराबाद, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्याची उत्सुकता सामान्य क्रिकेट चाहत्यांना आहे, तितकीच ती क्रिकेटपटूंमध्येही आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापला अंदाज बांधत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध मुंबईचेच पारडे जड राहिले आहे आणि त्यामुळे जेतेपदाचा निकाल हा मुंबईच्याच बाजूनं लागेल असं अनेकांना वाटत आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या या फायनल सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी चेन्नईला एक मोलाचा सल्ला दिला आहे. मुंबई इंडियन्सचे हे दोन खेळाडू डोकेदुखी ठरू शकतात आणि त्यांच्यापासून सावध राहण्यास रिचर्ड्स यांनी सांगितले आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी 3 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे चौथे जेतेपद कोण नावावर करणार याची उत्सुकता आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचे हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांच्यापासून चेन्नई सुपर किंग्सला सावध राहण्याचा सल्ला रिचर्ड्स यांनी दिला आहे. यंदाच्या मोसमात दोघांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल केली आहे. रिचर्ड्स म्हणाले,'' मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि त्यांच्या मधल्या फळीनंही भल्याभल्या गोलंदाजांना हैराण केले आहे. किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या हे चेन्नई सुपर किंग्ससाठी धोकादायक ठरू शकतात. चेन्नईच्या गोलंदाजांना पोलार्ड व पांड्याला रोखण्याची रणनीती आखावी लागेल.''
हार्दिकने यंदाच्या सत्रात धडाकेबाज खेळी केल्यात. त्याने 15 सामन्यांत 48.25 च्या सरासरीनं आणि 193 च्या स्ट्राईक रेटनं 386 धावा चोपल्या आहेत. शिवाय त्याने 14 विकेट्सही घेतल्या आहेत. पोलार्डने 30 च्या सरासरीनं व 155 च्या स्ट्राईक रेटनं 238 धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवचा खेळ पाहण्यासारखा असेल, असेही रिचर्ड्स यांनी सांगितले. चेन्नईविरुद्धच्या क्वालिफायर 1 मध्ये यादवने नाबाद 71 धावांची खेळी केली होती. त्याने यंदाच्या मोसमात मुंबईसाठी 15 सामन्यांत 409 धावा केल्या आहेत.
रिचर्ड्स म्हणाले,''सूर्यकुमार यादवनेही माझे लक्ष वेधले आहे. तो एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे आणि त्याची कामगिरी तो चोखपणे बजावतो. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाजाकडे हवा असलेला शांतपणा त्याच्याकडे आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे.''