नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असणार आहे. याआधी ही जबाबदारी राहुल द्रविड पार पाडत होता. मात्र भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्याने राहुल द्रविडने या पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी आता व्हीव्हीएस लक्ष्मणची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लक्ष्मणने ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली लक्ष्मणचे मन वळविण्यात यशस्वी ठरले. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आली. यासाठी सौरव गांगुली यांनी लक्ष्मणचे मन वळवले आहे. सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता.
n लक्ष्मणने याआधी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. मात्र हितसंबंधांच्या मुद्द्यामुळे त्याला या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच एनसीएच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्याला समालोचकाची भूमिकाही बजावता येणार नाही. n हैदराबाद सोडण्यास तयार नसल्यामुळे त्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास आधी नकार दिला होता. मात्र आता त्याला कमीत कमी २०० दिवस बंगळुरूमध्ये राहणे क्रमप्राप्त असेल. n लक्ष्मणच्या या निवडीमुळे आणि द्रविडच्या प्रशिक्षक पदामुळे आता भारताच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ क्रिकेटची जबाबदारी भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे. n बीसीसीआयने भारताच्या या दोन्ही गटातील क्रिकेटमध्ये समन्वय राखण्यासाठी या दोघांची निवड केली आहे. लक्ष्मणकडे आता भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाची एकूणच जबाबदारी राहणार आहे.