ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपतोय आणि या पदासाठी गौतम गंभीर हा आघाडीवर आहे. BCCI ने या पदासाठी मागवलेल्या अर्जासाठी गंभीर आणि डब्लूव्ही रमण यांचे नाव समोर आले आहे. या दोघांची नुकतीच मुलाखात घेतली गेली आणि गंभीरचे नाव आघाडीवर आहे. वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि ही गौतम गंभीरची टीम इंडियासोबतची पहिली असाईन्मेंट असल्याची चर्चा आहे. पण, आता नवीन माहिती समोर येत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियासोबत कोच म्हणून दुसरीच व्यक्ती जाणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण ( VVS Laxman ) आणि त्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( एनसीए ) मधील सपोर्ट स्टाफ ६ जुलैपासून झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गौतम गंभीर त्याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीला श्रीलंका दौऱ्यापासून सुरुवात करेल. झिम्बाब्वे मालिकेसाठीचा संघ या आठवड्याच्या अखेरीस जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
"लक्ष्मण एनसीएच्या काही प्रशिक्षकांसह झिम्बाब्वेला नवीन दमाच्या संघासोबत प्रवास करतील अशी शक्यता आहे. राहुल द्रविड आणि पहिल्या संघाच्या प्रशिक्षकांनी त्यांच्या कार्यकाळात वेळोवेळी ब्रेक घेतल्यावर लक्ष्मण आणि एनसीए टीमने ती जबाबदारी पार पाडलेली दिसली आहे," BCCIच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर PTIला सांगितले.
BCCI आगामी मालिकेसाठी युवा खेळाडूंचा संघ झिम्बाब्वेला पाठवणार आहे, ज्यामध्ये T20 विश्वचषक संघातील मोजक्याच खेळाडूंचा समावेश अपेक्षित आहे. नवोदित खेळाडूंमध्ये रियान पराग, अभिषेक शर्मा आणि अष्टपैलू नितीश रेड्डी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, यश दयाल किंवा हर्षित राणा या दोघांपैकी एकाला त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळू शकते. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्या किंवा सूर्यकुमार यादव यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे .