ठळक मुद्देआगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदारऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यातील यशानं खेळाडूंचे आत्मविश्वास उंचावले
चेन्नई : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच जेतेपदाचा दावेदार असेल, असे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी उंचावत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर 'विराट'सेनेची कामगिरी आणखी बहरली आहे. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत भारत हा एकमेव स्पर्धक नाही, तर त्यांच्यासमोर यजमान इंग्लंडचे कडवे आव्हान असेल, असे मत भारतीय संघाचा माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले.
इंग्लंडला घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदा होणार आहे. पण, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांना त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. विराट सेनेने ऑस्ट्रेलियाला 2-1 अशा आणि न्यूझीलंडला 4-1 अशा फरकाने पराभूत केले आहे. त्यामुळे इंग्लंडमध्येही भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा चषक उंचावेल, असा विश्वास अनेकांना वाटतो.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील कामगिरीचा भारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये नक्की फायदा मिळेल, असे लक्ष्मणला वाटते. तो म्हणाला,''योग्यवेळी कामगिरीचा स्तर उंचावणे महत्त्वाचे आहे. हा 50-50 षटकांचा वर्ल्ड कप आहे आणि त्यामुळे भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असल्यास सर्व खेळाडूंनी मानसिक करणखर व तंदुरुस्त असण्याची गरज आहे. या स्पर्धेत तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पण, माझ्यासाठी वर्ल्ड कप जेतेपदाच्या शर्यतीत भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आघाडीवर आहेत.''
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातून भारतीय संघ बऱ्याच सकारात्मक गोष्टी घेऊन मायदेशी परतला आहे. मोहम्मद शमीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले. अंबाती रायुडूनेही सातत्यपूर्ण कामगिरी करताना संघातील चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्याय असल्याचा दावा केला आहे. हार्दिक पांड्यानेही दमदार कमबॅक केले, महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांच्या जोडीची कमाल, भुवनेश्वर कुमारनेही अचूक मारा केला, दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांनीही मधल्या फळीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोरच ठेवून कामगिरीचा आलेख उंचावला आहे. लक्ष्मणनेही भारतीय संघाचे कौतुक केले. तो म्हणाला,''ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक करावे तितके कमी आहे. संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन. संघातील प्रत्येकाने योगदान दिले.''
Web Title: VVS Laxman says India are peaking at right time ahead of World Cup, picks his title favourites
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.