VVS Laxman Team India Head Coach: राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण हा आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचा कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे अशी घोषणा BCCI सचिव जय शाह यांनी केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. UAE मध्ये २७ ऑगस्टपासून सुरू होणारी टीम इंडियाची मालिका आणि आशिया चषक यांच्यामध्ये फारच कमी वेळ आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती जय शाह यांनी शुक्रवारी दिली. "व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रभारी कोच असतील. राहुल द्रविड विश्रांती घेत आहेत असे नाही. झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिका 22 ऑगस्ट रोजी संपेल आणि द्रविडसह भारतीय संघ २३ ऑगस्टला UAE मध्ये पोहोचेल. दोन स्पर्धांमध्ये थोडे अंतर असल्याने लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाचे प्रभारी असतील", असे स्पष्टीकरण BCCI सचिव जय शाह यांनी दिले.
झिम्बाब्वेमध्ये वन डे संघासोबत फक्त केएल आणि दीपक हुडा असल्याने, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे टी२० संघासोबत असणे हे तर्कसंगत आहे, असेही जय शाह म्हणाले. झिम्बाब्वेमध्ये १८, २० आणि २२ ऑगस्ट रोजी हरारे येथे तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. जय शाह यांनी असेही सांगितले की केएल राहुल आणि दीपक हुडा हे आशिया चषक संघाचा भाग असल्याने ते थेट हरारेहून दुबईला जातील.
BCCI मधील नियमानुसार दोन संघ एकाच वेळी खेळत असतील तर तुलनेने नवख्या संघावर नेहमी NCA च्या प्रमुखाद्वारे लक्ष ठेवले जाते आणि म्हणूनच जेव्हा पहिला संघ इतरत्र नियुक्त असेल तेव्हा लक्ष्मण दुसऱ्या भारतीय संघासोबत असेल. भारतीय संघ जून-जुलैमध्ये यूकेमध्ये होता, तेव्हा लक्ष्मण आयर्लंडमध्ये टी२० संघासोबत होता. कारण त्यावेळी राहुल द्रविड इंग्लंडमध्ये कसोटी संघासोबत होता. आता तसेच काहीसे येथेही होणार आहे. त्याशिवाय, शस्त्रक्रियेतून बरा झाल्यानंतर केएल राहुल प्रथमच पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे.