राहुल द्रविडनं ( Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि आजपासून त्याच्या मार्गदर्शनखाली टीम इंडिया मैदानावरही उतरली. राहुल द्रविड या भूमिकेत आल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ( NCA) प्रमुखपद रिकामी झाले होते. पण, ती जबाबदारी आता व्ही व्ही एस लक्ष्मण ( VVS Laxman) यानं स्वीकारली आहे. बीसीसीआयनं अजूनही याबाबत घोषणा केली नसली तरी अध्यक्ष सौरव गांगुलीनं ( Sourav Ganguly) PTIशी बोलताना लक्ष्मणच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता टीम इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी लक्ष्मण काम करणार आहे. पण, त्याच्यासाठी त्यानं बराच त्याग केला आहे आणि गांगुलीनं याबाबतही मोठा खुलासा केला. लक्ष्मण आता कुटुंबियांसोबत हैदराबादचं घर सोडून पुढील तीन वर्ष बंगलोरला शिफ्ट होणार आहे.
बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असताना गांगुलीनं लक्ष्मणकडे व्हिजन २०२०ची जबाबदारी सोपवली होती. गांगुली म्हणाला, ''मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी या दोघांची निवड झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही दोन पदं अत्यंत महत्त्वाची आहेत. या पदाचं महत्व त्यांना समजावून सांगितले आणि दोघंही तयार झाले. भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात आहे. भारतीय क्रिकेटसाठी दोघंही योगदान देऊ इच्छित आहेत.''
''लक्ष्मणच्या वचनबद्धतेमुळेच त्याची निवड झाली. त्याच्यासोबत काम करणे नेहमीच शानदार असते. भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. राहुलनं NCAमध्ये एक व्यवस्था तयार केली आहे आणि लक्ष्मण तिच पुढे कायम ठेवणार आहे. भारतीय क्रिकेटच्या सेवेसाठी तो पुढील तीन वर्षांसाठी हैदराबाद येथून बंगलोरला शिप्ट होणार आहे. त्याचं उत्पन्नही घटणार आहे, परंतु तरिही तो तयार झाला. त्याच्यासोबत त्याची पत्नी व मुलंही बंगलोरला येतील. बंगलोरला शिक्षण घेणं आणि नव्या वातावरणात स्वतःला अॅडजस्ट करणे सोप नक्कीच नसेल,''असेही गांगुलीनं सांगितले.