जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सी (WADA) ने भारताच्या डोपिंग विरोधी कार्यक्रमात विशेषत: देशातील क्रीडापटूंना लक्ष्य करत अपुर्या डोपिंग चाचणीचे पुरावे उघड केले. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीचा अधिकार (आरटीआय) कायदा, २००५ अंतर्गत जारी केलेल्या डेटामध्ये २०२१ आणि २०२२ दरम्यान भारताच्या क्रिकेटपटूंच्या डोप चाचणीमध्ये अनियमितता दिसून आली आहे.
ऑगस्ट २०१९ पासून, क्रिकेटला राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी एजन्सीच्या (NADA) अखत्यारीत आणण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटूंची NADA द्वारे चाचणी केली जाईल असे याआधी सांगण्यात आले होते, परंतु डेटामध्ये वेगळंच चित्र दिसत आहे. इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२२ दरम्यान एकूण ५९६१ चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी केवळ ११४ चाचण्या क्रिकेटपटूंवर केंद्रित होत्या. दुसरीकडे, ऍथलीट्सच्या १७१७ चाचण्या घेण्यात आल्या.
रोहित शर्माची सर्वाधिक चाचणी, १२ खेळाडूंवर शून्य चाचणीभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने दोन वर्षांच्या कालावधीत मुंबई, अहमदाबाद, चेन्नई आणि UAE येथे डोप नियंत्रण अधिकार्यांकडून सहा भेटी देऊन सर्वाधिक चाचणी करून घेतल्या. रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा यांच्यासह सात खेळाडूंची एकदाच चाचणी घेण्यात आली.
धक्कादायक म्हणजे, NADA ने BCCI सोबत करार केलेल्या २५ पैकी १२ पुरुष खेळाडूंच्या एकदाही चाचण्या घेतल्या गेल्या नाहीत. या यादीत माजी कर्णधार विराट कोहली, सध्याचा मर्यादित षटकांचा कर्णधार हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर आणि दीपक हुडा यांचा समावेश आहे. फलंदाज संजू सॅमसन, श्रीकर भरत आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हेही या यादीत आहेत.
महिला राष्ट्रीय संघातील प्रत्येक खेळाडूला या कालावधीत किमान एकदा तरी डोपिंग चाचणी प्रक्रियेला सामोरे जावे लागले. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांची जास्तीत जास्त ३ वेळा चाचणी करण्यात आली.