मुंबई : ‘वाडेकर सरांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे नसणे म्हणजे न भरुन येणारे नुकसान आहे. हे एकप्रकारे माझे वैयक्तिक नुकसान असल्याचेही मी म्हणेन. लोकांनी वाडेकरांना महान क्रिकेटपटू म्हणून बघितलं. पण मी भाग्यशाली आहे, एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून वाडेकरांना मी अत्यंत जवळून पाहिले आहे. माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे होते,’ अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकरने भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी वाडेकर यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी क्रिकेट व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भारताच्या या महान कर्णधाराला अखेरचा निरोप दिला. त्याआधी सकाळी १० वाजता वरळी सी फेस येथील स्पोर्ट्सफील्ड अपार्टमेंट या वाडेकरांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी वाडेकर यांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर सचिनने वाडेकरांच्या आठवणींना उजाळा दिला. सचिनने सांगितले की, ‘माझ्या आयुष्यात वाडेकर सरांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. मला अजूनही लक्षात आहे की, जेव्हा मी २० वर्षांचा होतो तेव्हा परिस्थिती खूपच नाजूक होती. या वयामध्ये लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी एका अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची मला गरज होती. एका अशा व्यक्तीची गरज होती ज्यांनी उच्च दर्जाचे क्रिकेट खेळले होते आणि वाडेकर सरांच्या रुपात मला ते मार्गदर्शन मिळाले. खेळाडूंच्या गुणवत्तेला कशाप्रकारे चालना द्यायची हे वाडेकर सरांना माहिती होते. ते जेव्हा भारतीय संघासोबत होते, तेव्हा मला स्वतःला सरांचा खूप फायदा झाला. वेळोवेळी मला त्यांच्याकडून अनेक संदेश मिळायचे. फलंदाजी करतानाही त्यांचे संदेश येत असायचे. ते भारताचे महान कर्णधार, प्रशिक्षक आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचे म्हणजे ते माझे अत्यंत चांगले मित्र होते. आमची मैत्री अशी होती की, संध्याकाळी आम्ही कोणत्याही विषयांवर गप्पा मारायचो. त्यामुळे आमचे नातं खूप घट्ट झालेलं.’
सरांशी गप्पा मारताना वेळ कधी जायचा समजायचेच नाहीजेव्हा कधी सामन्याविषयी किंवा क्रिकेटवर चर्चा असायची तेव्हा वाडेकर सर अत्यंत गंभीर असायचे. पण ज्यावेळी संध्याकाळी आम्ही गप्पा मारायला किंवा जेवायला एकत्र बसायचो, तेव्हाही तेच मैफिल रंगवायचे. त्यांची विनोदबुद्धी जबरदस्त होती. ते प्रत्येकाचे आवडते व्यक्तिमत्त्व होते. आम्ही पण वाट बघायचो की, कधी संध्याकाळ होते आणि आम्ही सरांसोबत गप्पा मारायला बसतो.