बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीनं धुमाकूळ घालणाऱ्या पाकिस्तानचा स्टार गोलंदाज वहाब रियाझला स्पर्धेच्या मध्यावर मोठी बातमी मिळाली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या काळजीवाहू सरकारचे क्रीडा मंत्री म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, तो सध्या बांगलादेश लीगमध्ये व्यस्त असल्याने शपथविधी सोहळ्यात तो सहभागी होऊ शकणार नाही. दौऱ्याहून परतल्यानंतरच तो शपथ घेणार आहे. या डावखुऱ्या गोलंदाजाने पाकिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅट मिळून १५६ सामन्यांत एकूण २३७ बळी घेतले आहेत. तर २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचाही तो भाग होता.
२०१९ मध्ये रियाझने कसोटी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. विश्रांती घेत असताना तो म्हणाला होता की त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. मात्र, गेल्या २ वर्षांपासून तो पाकिस्तानकडून मर्यादित षटकांचे सामनेही खेळू शकलेला नाही.
T20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरीवहाब रियाझला २०२० पासून पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळू शकली नाही, परंतु तो बांगलादेश लीगमध्ये दमदार कामगिरी करत आहे. गेल्या १० दिवसांत त्याने बांगलादेश लीगमध्ये ९ विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी त्याने ४०० टी-२० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. हा टप्पा गाठणारा तो पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. एवढेच नाही तर ड्वेन ब्राव्हो, राशिद खान, सुनील नरेन, इम्रान ताहिर आणि शकीब अल हसन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो जगातील सहावा गोलंदाज आहे.
संघ निवडीवर उपस्थित केलं होतं प्रश्नचिन्हपाकिस्तान क्रिकेट बोर्डात सत्तापालट झाल्यानंतर रियाझनेही संघावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याने निवड समितीवर निशाणा साधला होता. ज्या खेळाडूंची कामगिरी फक्त रमीझ राजाला दिसत होती, अशा खेळाडूंची संघात निवड केली जात असल्याचे रियाझने म्हटले होते. माजी अध्यक्ष रमीझ राजा यांचा लॅपटॉप पाहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. रमीझचा लॅपटॉप त्याला कसा मार्गदर्शन करतो हे पाहायचे आहे, असा टोमणा वहाब रियाझ यानं मारला होता.