ravi shastri on icc trophy : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाला मोठ्या कालावधीपासून आयसीसीचे एकही विजेतेपद जिंकता न आल्याने मोठे विधान केले आहे. भारतीय चाहत्यांनी थोडा धीर धरावा, कारण जेव्हा टीम इंडिया विजेतेपद जिंकण्यास सुरुवात करेल तेव्हा ती सतत जिंकेल असे त्यांनी म्हटले आहे. रवी शास्त्री यांच्या मते, संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
खरं तर भारतीय संघाने 2013 पासून अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. भारतीय संघ अनेकवेळा उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला. पण त्यांना विजेतेपद पटकावता आले नाही. भारतीय संघ 2014 च्या वर्ल्ड ट्वेंटी-20 च्या अंतिम फेरीत पोहोचला पण श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच वेळी, 2015 च्या विश्वचषकात संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. 2016 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकातही संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. तसेच 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही संघाचा पराभव झाला होता. 2021 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतच संघ बाहेर पडला होता. याशिवाय 2022 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकात रोहित सेनेला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. ICC ट्रॉफीसाठी थोडा धीर धरा - रवी शास्त्रीरवी शास्त्री यांनी स्पोर्ट्स यारीवरील संभाषणात म्हटले, "माझ्या मते, मोठ्या कालावधीनंतर भारताला अजून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पण संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेकदा फायनल आणि उपांत्य फेरी गाठली आहे. सचिन तेंडुलकरकडे पाहा, आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी त्याला सहा विश्वचषक खेळावे लागले. सहा विश्वचषक म्हणजे 24 वर्षे. त्याच्या शेवटच्या विश्वचषकात त्याने जेतेपद पटकावले. लिओनेल मेस्सीकडे पाहा, त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मेस्सीने अंतिम सामन्यात देखील गोल केला. त्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, मग ट्रॉफींचा पाऊस पडेल."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"