मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इटलीतील बोर्गो फिनोखिएतो रिसॉर्टमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. यानंतर दोघेही हनिमूनसाठी रोमला गेले असून, त्यांचे कुटुंबिय भारतात परतले आहेत. मुंबई आणि दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून, कुटुंबिय त्याची तयारी करत आहेत. विरुष्का नेमकं लग्न करणार आहेत की नाहीत याबाबत अनेकांना उत्सुकता होती. अखेर दोघांनी 11 डिसेंबरला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. दोघांचेही चाहते, नातेवाईक, मित्रमंडळींनी फोटो लाईक, रिट्विट करत शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
लग्नाच्या घाईगडबडीत शुभेच्छांना उत्तर देणं दोघांनाही शक्य नव्हतं. मात्र आता निवांत वेळ असल्याने विराट कोहली आणि अनुष्का शुभेच्छा देणा-यांचे आभार मानत आहे. विराटने तर आपल्या एका विवाहित मित्राच्या शुभेच्छाला उत्तर देताना टिप्सही मागितल्या आहेत. हा मित्र म्हणजे भारतीय संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणेने विराटला शुभेच्छा देणारं ट्विट केलं होतं. एका नव्या इनिंगसाठी शुभेच्छा, क्लबमध्ये आपलं स्वागत आहे असं ट्विट अजिंक्य रहाणेने केलं होतं.
विराट कोहलीने गुरुवारी अजिंक्य रहाणेच्या ट्विटला उत्तर दिलं. कोहलीने लिहिलं की, 'धन्यवाद मित्रा. मी तुझ्या टिप्सची वाट पाहत आहे'.
मुंबई आणि दिल्लीत जंगी रिसेप्शन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. सध्या विराट आणि अनुष्का रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इकडे त्यांचे कुटुंबिय मात्र रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त आहेत. विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर आता जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचं रिसेप्शन कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला बॉलिवूड आणि क्रिकेटर्ससाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिसेप्शनला मोठमोठे सेलिब्रेटी आणि क्रिकेटर उपस्थित राहणार आहेत.
अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहलीअनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे. अनुष्काचं संपुर्ण कुटुंब विराट कोहलीला चांगल्या प्रकारे ओळखतं.
विरुष्का विकणार लग्नाचे फोटोलग्नात फोटो काढण्यामागे विराट आणि अनुष्काचं एक खास कारण होतं. हे सर्व फोटो एका अमेरिकन मॅगजिनला विकण्यात येणार असून, मिळणारे पैसे दान म्हणून देण्यात येणार आहेत. विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लवकरच विरुष्काच्या लग्नाचे फोटो एका मॅगजिनच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत. हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध फॅशन मॅगजिन असणार आहे. विरुष्काच्या या निर्णयामुळे चाहते शुभेच्छांनंतर आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत.