Join us  

पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."

Kamran Ghulam, R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: स्टार फलंदाज बाबर आझमला ( Babar Azam ) संघाबाहेर काढून त्याच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलाम याने धमाकेदार शतक ठोकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 7:34 PM

Open in App

Kamran Ghulam, R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर पाकिस्तानच्या ( Pakistan ) संघाने दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस आपल्या नावे केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या पाकिस्तानने ९० षटकांच्या पहिल्या दिवसाच्या खेळात ५ बाद २५९ धावा केल्या. स्टार फलंदाज बाबर आझमला ( Babar Azam ) संघाबाहेर काढून त्याच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलाम याने धमाकेदार शतक ठोकले. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने ११८ धावांची खेळी केली आणि पाकिस्तानच्या डावाला भक्कम पाया रचून दिला. त्याच्या फलंदाजीचे कौतुक केवळ पाकिस्तानी खेळाडूंनीच नव्हे तर भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केले.

गेल्या सामन्यापर्यंत बाबर आझम हा पाकिस्तानी संघाचा अविभाज्य भाग मानला जात होता. पण सलग ९ कसोटी सामन्यात एकही अर्धशतक न झळकावणाऱ्या बाबरला निवडकर्त्यांनी दुसऱ्या कसोटीत बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या जागी संघात कामरान गुलामचा समावेश करण्यात आला. बाबरला संघातून काढणे योग्य नाही अशी चर्चा सामना सुरु होण्याआधीपर्यंत सुरु होती. पण आज पहिल्या दिवसाचा खेळ झाला आणि कामरान गुलामची साऱ्यांनीच स्तुती केली. भारतीय स्पिनर आर अश्विननेदेखील त्याची स्तुती केली. "सर्व जण 'बाबर'च्या नावाची चर्चा करत असताना कामरान गुलाम एका वादळात चालत आला आणि शानदार शतक झळकावले," अशी शब्दांत अश्विनने त्याचे कौतुक केले.

दरम्यान,  इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यातून कामरान गुलामने जोशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्टार बॅटर बाबर आझमच्या जागी मिळालेल्या संधीचं सोन करताना त्याने शतकी खेळी साकारली. त्यामुळे पदार्पणाचा सामना त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. पाकिस्तानकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा तो १३वा खेळाडू आहे. या कामगिरीसह त्याने खास क्लबमध्येही एन्ट्री मारली आहे. कामरान गुलामला वयाच्या २९ व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली. शतकी खेळीसह त्याने आपली निवड सार्थ ठरवली. पदार्पणात शतकी खेळी करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकाचा वयस्क खेळाडू ठरला. या आधी आबिद अली याने तिशी पार झाल्यावर पदार्पण करत पदार्पणात शतक झळकावले होते.

टॅग्स :पाकिस्तानआर अश्विनइंग्लंडबाबर आजम