मुंबई - कुठल्याही सांघिक क्रीडा प्रकारात जेव्हा एखादा संघ विश्वविजयी ठरतो तेव्हा त्या वर्ल्डकपमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या खेळाडूंइतकीच त्या संघाच्या प्रशिक्षकाबद्दल चर्चा होते. 2014 सालच्या फुटबॉल वर्ल्डकपचेच उदहारण घ्या. अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव करुन वर्ल्डकपवर नाव कोरले. त्यावेळी जर्मन संघाबरोबर जोकिम लो या नावाची बरीच चर्चा झाली होती. जर्मन माध्यमांनी जोकिम लो यांना सुद्धा त्या विजयाचे श्रेय दिले होते. प्रशिक्षक प्रत्यक्षात मैदानावर खेळत नसतो पण संघाच्या जय-पराजयात त्याची भूमिका अत्यंत महत्वाची असते.
फुटबॉल, क्रिकेट या सारख्या सांघिक खेळांमध्ये रणनिती आणि खेळाडूंची पारख खूप महत्वाची असते. आज भारताच्या युवा खेळाडूंनी अंडर-19 चा वर्ल्डकप जिंकला. निश्चितच पृथ्वी शॉ च्या संघाला या विजयाचे श्रेय जाते पण त्याचवेळी हा संघ घडवणारा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला विसरुन चालणार नाही. भारताच्या महान क्रिकेटपटूंमध्ये समावेश होणा-या राहुल द्रविडने प्रत्यक्षात मैदानावर खेळतानाही भारतीय क्रिकेटला अमुल्य योगदान दिले आहे. आता प्रशिक्षक म्हणूनही तो आपली भूमिका चोख बजावत आहे.
प्रशिक्षक म्हणून राहुलने खेळाडूंना जो कानमंत्र दिला. अनुभव शेअर करताना जे मानसिक बळ दिले त्यामुळेच आज पुन्हा एकदा विश्वविजयाचे स्वप्न साकार झाले. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनलाही द्रविड प्रशिक्षक म्हणून जास्त भावतो. केपी या आपल्या आत्मचरित्रातून त्याने द्रविडच्या कोचिंग कौशल्याचे कौतुक केले आहे. राहुल द्रविड त्याच्या काळातील एक महान क्रिकेटपटू आहे. राहुल द्रविडने माझ्या खेळात सुधारणा घडवून आणली. खेळाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला असे पीटरसनने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी नेमलेल्या सचिन, सौरव आणि लक्ष्मण या त्रिसदस्यीय समितीने सर्वप्रथम राहुल द्रविडच्या नावाचा विचार केला होता. पण द्रविडने त्याच्यावरील अन्य जबाबदा-यांचा विचार करुन भारताच्या युवा क्रिकेटची धुरा हाती घेण्याचा निर्णय घेतला. भारताच्या अंडर-19 संघाचे प्रशिक्षकपद राहुलने स्वीकारले. आज टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयानंतर राहुल द्रविडने त्याची जबाबदारी किती चोखपणे पार पाडली हे दिसून येते.
बीसीसीआयने विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 30 लाख आणि राहुल द्रविडला 50 लाखाचे इनाम जाहीर केले त्यातच सारे काही समजून घेण्यासारखे आहे. राहुल द्रविड शांत, संयमी स्वभावाचा क्रिकेटपटू आहे. तो जेव्हा खेळायचा तेव्हा सुद्धा त्याच्या वृत्तीमध्ये कधीही आक्रमकपणा दिसला नाही पण मैदानावर आपल्या खेळातून त्याने आक्रमकपणाचे दर्शन घडवले. आता प्रशिक्षक म्हणूनही तेच दिसत आहे.
आजच्या भारतीय संघातील स्टार हार्दिक पांडया सुद्धा त्याच्यात खेळात झालेल्या सुधारणेचे श्रेय राहुल द्रविडला देतो. हार्दिकने 2016 साली भारतीय अ संघातून ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी द्रविड कोच होता. राहुल द्रविडमुळे माझ्या खेळात सुधारणा झाली त्याने मला मानसिकदृष्टया कणखर बनवले असे पांडयाने सांगितले. या अंडर -19 वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. त्यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू, समालोचक रमीझ राजाने पाकिस्तानकडे राहुल द्रविडसारखा खेळाडू हवा होता असे मत व्यक्त केले. राहुल द्रविडने स्वत: खेळताना क्रिकेटप्रेमींना आनंदाचे अनेक क्षण दिले. आता प्रशिक्षक म्हणून पडद्यामागे राहूनही राहुल भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद, समाधानाचे क्षण देत आहे.