भारताचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूपैकी एक वॉल्टर डिसूजा यांनी शुक्रवारी आपल्या निवास स्थानी अखेरचा श्वास घेतला. ते 93 वर्षांचे होते आणि झोपेत असतानाच त्यांचे निधन झाले. डिसूजा यांच्या निधनानं भारतीय क्रिकेटला मोठा धक्क बसला आहे. डिसूजा यांनी गुजरात आणि एसीसी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी इंदूर येथे होळकर संघाविरुद्ध गुजरातकडून 1950-51च्या सत्रात रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यात त्यांनी 50 व 77 धावा केल्या होत्या.
गुजरातचे माजी प्रशिक्षक विजय पटेल यांनी डिसूजा यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी सांगितले की,''2017मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात आणि शेष भारत यांच्यात इराणी चषक स्पर्धेचा सामना होणार होता. तो सामना पाहण्यासाठी आम्ही डिसूजा यांना आमंत्रित केले होते. तेव्हा ते 90 वर्षांचे होते. तेव्हा ते वेळेवर तेथे आले आणि त्यांनी खेळाडूंशी चर्चा केली.''
डिसूजा यांनी 20 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले, 1947 ते 1966 त्यांनी क्रिकेट खेळले. त्यांनी गुजरातसाठी 16 सामन्यांत 27 डावांमध्ये 35.69च्या सरासरीनं 821 धावा केल्या.