Join us  

Hasaranga, Asia Cup 2022 SL vs PAK: श्रीलंकन फिरकीपुढे पाकिस्तानची धूळधाण; १२१ धावांत आटोपला डाव

श्रीलंकेला विजयासाठी १२२ धावांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 9:28 PM

Open in App

Hasaranga, Asia Cup 2022 SL vs PAK: आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या फायनलची रंगीत तालीम असलेल्या सामन्यात श्रीलंकन फिरकीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांची धूळधाण उडाली. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाचे २१ धावांत ३ बळींच्या जोरावर श्रीलंकेने १९.१ षटकांतच पाकिस्तानचा डाव १२१ धावांमध्ये संपुष्टात आणला. मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम ही जोडी पाकिस्तानला चांगली सुरूवात मिळवून देऊ शकले नाहीत. त्यानंतर इतर फलंदाजही केवळ हजेरी लावून तंबूत परतले. त्यामुळे आता श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १२२ धावांची आवश्यकता आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवला. सुरूवातीपासून पाकिस्तानच्या फलंदाजीची दाणादाण उडाली. मोहम्मद रिझवान १४ तर बाबर आझम ३० धावा काढून माघारी गेले. त्यानंतरचे फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत. फखर झमानने १३, इफ्तिखार अहमदने १३ धावा केल्या. बाकीच्यांना तर दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. खुशदिल शाहने ४, आसिफ अलीने ०, हसन अलीने ०, उस्मान कादीरने ३ आणि हॅरिस रौफने १ धाव केली. मोहम्मद नवाझने २ षटकार आणि १ चौकार खेचत थोडीशी झुंज दिली, पण १८ चेंडूत २६ धावा केल्यानंतर तो धावचीत झाला. त्यामुळे पाकिस्तानचा डाव १९.१ षटकांत १२१ धावांवर आटोपला. वानिंदू हसरंगाने सर्वाधिक ३, तिक्षणा-मदुशनने प्रत्येकी २ तर धनंजया-करूणरत्नेने १-१ बळी टिपला.

श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात रविवारी आशिया कपची फायनल मॅच होणार आहे. त्याआधीच्या रंगीत तालमीत पाकिस्तानने शादाब खान आणि नसीम शाहला बाहेर बसवून उस्मान कादीर आणि हसन अलीला संधी दिली आहे. तर श्रीलंकेने असलंका व फर्नांडोला विश्रांती देऊन धनंजय डिसिल्वा व प्रमोद मुधशनला संधी दिली आहे.

टॅग्स :एशिया कप 2022श्रीलंकापाकिस्तानबाबर आजम
Open in App