Join us  

Wanindu Hasaranga Rahul Tripathi, IPL 2022 RCB vs SRH Live: हसरंगाने केला SRHच्या रंगाचा बेरंग! RCB ने मिळवला मोठा विजय; प्ले ऑफ्सचं गणित झालं अधिकच सोपं

RCB चे १२ सामन्यात १४ गुण; ठरले PlayOffsसाठीचे प्रबळ दावेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 7:40 PM

Open in App

Wanindu Hasaranga Rahul Tripathi, IPL 2022 RCB vs SRH Live: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या वानिंदू हसरंगाने १८ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर RCB ने सनरायझर्स हैदराबाद संघावर ६७ धावांनी मोठा विजय मिळवला. फाफ डू प्लेसिसचे नाबाद अर्धशतक आणि दिनेश कार्तिकची फटकेबाजी याच्या जोरावर RCB ने २० षटकात SRH ला १९३ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात SRH कडून राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावले. त्याशिवाय, इतर कोणत्याही खेळाडूही फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. RCB ने या विजयासह १४ गुणांची कमाई केली. त्यामुळे त्यांच्यासाठी प्ले-ऑफचं गणित अधिकच सोपं झालं आहे.

बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर विराट कोहलीची विकेट गमावली. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार जोडीने १०५ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार अर्धशतकाजवळ असताना त्याला बाद व्हावे लागले. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार खेचत ४८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूत ३३ धावांची वेगवान खेळी केली. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने संपूर्ण २० षटके खेळून ५० चेंडूत ७३ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्यातच दिनेश कार्तिकने डावाला फिनिशिंग टच दिला. त्याने ८ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३० धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केन विल्यमसन एकही चेंडू न खेळता पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला. त्याच षटकात अभिषेक शर्मादेखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम जोडीने काही काळ संघर्ष केला. मार्करम मोठा फटका खेळताना २७ चेंडूत २१ धावांवर बाद झाला. निकोलस पूरनही १९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जगदीश सुचिथ (२), शशांक सिंग (८), कार्तिक त्यागी (०), उमरान मलिक (०) यांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. वानिंदू हसरंगाच्या फिरकीने हैदराबादचा निम्मा संघ फिरकीत गुंडाळला. त्याने १८ धावांत ५ बळी घेत विजयाच सिंहाचा वाटा उचलला.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीकेन विल्यमसनदिनेश कार्तिक
Open in App